हज यात्रेकरूंचे पहिले प्रशिक्षण उत्साहात
By Admin | Published: May 22, 2016 12:21 AM2016-05-22T00:21:27+5:302016-05-22T00:37:31+5:30
औरंगाबाद : मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातून यंदा पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे पहिले प्रशिक्षण शिबीर शनिवारी ऐतिहासिक जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे घेण्यात आले.
औरंगाबाद : मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातून यंदा पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे पहिले प्रशिक्षण शिबीर शनिवारी ऐतिहासिक जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे घेण्यात आले. हज कमिटीशिवाय टूर कंपन्यांमार्फत जाणाऱ्या यात्रेकरूंनीही प्रशिक्षण सत्रास अलोट गर्दी केली होती.
आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक भाविकाची इच्छा होते. सौदी अरेबिया सरकारने मागील काही वर्षांपासून भारताचा कोटा कमी केल्याने यात्रेला जाण्यासाठी भाविकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. अनेक वर्षे हज कमिटीमार्फत क्रमांकच लागत नाही. तीन-चार वर्षे वेटिंगमध्ये थांबल्यावर अनेक भाविकांना संधी प्राप्त होते.
मराठवाड्यातील आठ जिल्हे व अहमदनगर येथील यात्रेकरू मागील काही वर्षांपासून चिकलठाणा विमानतळावरून थेट जेद्दा येथे रवाना होत आहेत. यात्रेकरूंच्या सोयीसाठी मरकज-ए-हुज्जाज कमिटीतर्फे विविध प्रशिक्षण शिबीर घेण्यात येतात. २०१६ मध्ये नऊ जिल्ह्यांतील २ हजार ३०२ यात्रेकरूजाणार आहेत. त्यांच्यासाठी शनिवारी पहिले प्रशिक्षण घेण्यात आले. ‘हज का सफर’या विषयावर दिवसभर तज्ज्ञांनी भाविकांना मार्गदर्शन केले. मौलाना नसीम मुफ्ताही, हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष करीम पटेल, डॉ. सदरूल हसन नदवी यांनी विविध सत्रांमध्ये भाविकांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी भाविकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही तज्ज्ञांनी दिली.
आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चिकलठाणा विमानतळावरून सर्व भाविक रवाना होतील.