हळदीने मोंढा गजबजला
By Admin | Published: May 23, 2016 11:40 PM2016-05-23T23:40:48+5:302016-05-24T01:06:12+5:30
हिंगोली : येथील मोंढ्यात हमाल व व्यापारी यांच्यातील किरकोळ वादामुळे आठ दिवसांपासून मोंढा बंद होता. मात्र बाजार समितीचे नियम हमाल व मापाऱ्यांना मान्य झाल्यानंतर
हिंगोली : येथील मोंढ्यात हमाल व व्यापारी यांच्यातील किरकोळ वादामुळे आठ दिवसांपासून मोंढा बंद होता. मात्र बाजार समितीचे नियम हमाल व मापाऱ्यांना मान्य झाल्यानंतर आठ दिवसांच्या विलंबाने मोंढ्यात पुन्हा रेलचेल सुरु झाली असून, तब्बल अडीच हजार क्ंिवटल हळदीची आवक होऊन शेतकरी आले त्याच दिवशी घरी परतले.
हिंगोलीतील बाजार समितीत वेळीच मालाची खरेदी होऊन काही तासांत शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळत असल्याची ओळख सर्वदूर असल्याने, येथे बाहेर जिल्ह्यातून शेतकरी हळद विक्रीसाठी घेवून येतात. त्यातच खरिपाची पेरणी अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी मोंढ्यात माल विक्रीसाठी घेवून येत आहेत. परंतु आठ दिवसांपूर्वी हमाल व व्यापारी यांच्यातील किरकोळ वादामुळे मोंढा बंद ठेवण्याची वेळ बाजार समितीवर आली होती. या कालावधीत जवळपास १० ते १२ लाखांचे बाजार समितीचे नुकसानही झाले होते. आठ दिवसांनी का होईना पहिल्याच दिवशी हळदीची बीट झाल्याने शेतकरी समाधानी झाले होते. बाजार समितीच्या वतीने व्यापारी, हमाल व मापाऱ्यांना घालून दिलेले नियम मान्य असल्याने शेतकऱ्यांचा तीन ते चार दिवसांचा मुक्काम टळण्यास मदत झाली आहे. सोमवार ते शुक्रवार बाजार समितीत सकाळी ७ ते १२ या वेळेत माल उतरविता येणार आहे. उशिरा आलेली ५ ते ६ वाहने परत करण्यात आली होती. १२ वाजता बीट सुरु २ वाजता काटा सुरू करुन शेतकऱ्यांचा आलेला माल सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेतकऱ्यांना खुले करण्याचा प्रयत्न केला जात होता. (प्रतिनिधी)
बाजार समितीच्या वतीने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन झाल्यास किंवा शेतकऱ्यासोबत पुन्हा आडमुठे धोरण अवलंबण्याचा प्रयत्न केल्याचे बाजार समितीच्या लक्षात आले तर त्या संबंधित संघटनेविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी सांगितले.
पूर्वी बाजार समितीत हळद विक्रीस घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना तीन ते चार दिवसांचा मुक्काम ठोकावा लागत होता. आता वेळ कमी होणार असून, शेतकऱ्यांनीही वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे.