ऑगस्टची सुरुवात कोरडी; मराठवाड्यातील धरणांत फक्त ४७ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 12:22 PM2021-08-13T12:22:24+5:302021-08-13T12:23:24+5:30

Rain in Marathwada : नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे.

Half August dry; Only 47% water in dams in Marathwada | ऑगस्टची सुरुवात कोरडी; मराठवाड्यातील धरणांत फक्त ४७ टक्के पाणी

ऑगस्टची सुरुवात कोरडी; मराठवाड्यातील धरणांत फक्त ४७ टक्के पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देविभागातील सर्व ८७९ प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.८ हजार १९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या प्रकल्पांत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विभागात ८७९ प्रकल्पांत फक्त ४७ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ५३ टक्के पाणी असून, सर्व धरणांची तहान वाढू लागली आहे. त्यातल्या त्यात ऑगस्ट महिना आतापर्यंत कोरडाठाक आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचे पुनरागमन होईल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.

नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे विभागातील गोदावरी नदी पात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे निसर्गाचा असमतोल यंदाच्या पावसाळ्यात दिसतो आहे. विभागातील सर्व ८७९ प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. ८ हजार १९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या प्रकल्पांत आहे. मोठ्या प्रकल्पांत क्षमतेच्या तुलनेत ५३ टक्केच जलसाठा असल्यामुळे विभागाची चिंता वाढली आहे. पावसाळ्याचे फक्त ४८ दिवस उरले आहेत. आता परतीच्या पावसावरच सगळी मदार असल्याचे बोलले जात आहे.

५६०० दलघमी पाणीसाठ्याची तूट
११ मोठ्या प्रकल्पांत २ हजार ७९८ दलघमी उपयुक्त साठा आहे. मागच्या वर्षी ३०२० दलघमी पाणी मोठ्या प्रकल्पांत होते. सुमारे १२०० दलघमीची तूट मोठ्या प्रकल्पात आहे. ५६०० दलघमी पाण्याची तूट सर्व ८७९ प्रकल्पांत आहे. या प्रकल्पांत ३ हजार ७९६ दलघमी पाणीसाठा सध्या आहे. मोठ्या ११ प्रकल्पांवरच विभागातील ६० टक्के भूभागाची तहान भागते. त्यामुळे या प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. विभागातील आठही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आजवर ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. चार मोठ्या प्रकल्पात ६० टक्क्यांच्या पुढे जलसाठा आहे. जायकवाडीत फक्त ४० टक्के साठा आहे.

मराठवाड्यातील जलसंपदा अशी
प्रकल्प             संख्या जलसाठा
मोठे प्रकल्प            ११ ५३ टक्के
मध्यम प्रकल्प ७५ ३९ टक्के
लघू प्रकल्प ७५३ ३१ टक्के
गोदावरीनदी बंधारे १५ ५० टक्के
तेरणा व बंधारे २५ ४८ टक्के
एकूण             ८७९             ४७ टक्के

Web Title: Half August dry; Only 47% water in dams in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.