दीड लाखाचा बर्थिंग बेड बनवला ३७०० रुपयांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:32 AM2018-10-11T00:32:32+5:302018-10-11T00:33:30+5:30
गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाने दीड लाखाचा बर्थिंग बेड अवघ्या ३ हजार ७०० रुपयांत तयार केला आहे. सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या तीन बर्थिंग बेडच्या वापरामुळे सामान्य प्रसूतीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.
औरंगाबाद : गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाने दीड लाखाचा बर्थिंग बेड अवघ्या ३ हजार ७०० रुपयांत तयार केला आहे. सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या तीन बर्थिंग बेडच्या वापरामुळे सामान्य प्रसूतीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.
घाटी रुग्णालयात वर्षभरात १८ हजारांहून अधिक प्रसूती आणि ४ हजारांवर सिझेरियन प्रसूती होतात. दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. रुग्णालयात दुर्व्यवहारापासून मुक्ती, प्रसूतीदरम्यान सोबतीसाठी व्यक्तीची निवड, एकांतता तथा गोपनीयता, सन्मानपूर्ण व्यवहार, भेदभावापासून मुक्ती, उच्चस्तरातील आरोग्य देखभाल आणि कोणत्याही प्रकारच्या दबावापासून मुक्ती हे गरोदर मातांचे ७ हक्क आहेत. या सर्व हक्कांचे पालन घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागात होत आहे. या ठिकाणी सामान्य प्रसूतीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. सामान्य प्रसूतीच्या दृष्टीने परदेशामध्ये बर्थिंग बेडचा वापर केला जातो.
सामान्यपणे प्रसूती झोपलेल्या अवस्थेत केली जाते; परंतु गुरुत्वाकर्षणामुळे बसलेल्या अवस्थेत प्रसूती सहज होते. बर्थिंग बेडला असलेल्या विशिष्ट आकारातील रॉडमुळे अशी प्रसूती शक्य होते. परदेशासह भारतात अनेक ठिकाणी या खाटेचा वापर होतो. घाटीत सुरक्षित आणि सुसह्य प्रसूतीसाठी डॉ. गडप्पा यांनी रुग्णालयातील खाटेलाच बर्थिंग बेडमध्ये रूपांतरित करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. विजय कल्याणकर आदींनी प्रयत्न केले.
किचन ट्रॉली बनविणाऱ्यांची मदत
किचन ट्रॉली बनविणाºयांची मदत घेण्यात आली. दीड लाखाचा हा बेड अवघ्या ३७०० रुपयांत तयार झाला. अशा प्रकारच्या तीन खाटा तयार करण्यात आल्या असून, सहा महिन्यांपासून त्याचा वापर केला जात असल्याचे डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.
कॅप्शन...
घाटीतील प्रसूतिशास्त्र विभागात तयार करण्यात आलेला बर्थिंग बेड.