अर्धे सिडको महानगर ५ तास अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 08:51 PM2019-08-26T20:51:05+5:302019-08-26T20:51:16+5:30
रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत तब्बल ५ तास अर्ध्या सिडकोचा वीजपुरवठा बंद होता.
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर महावितरण उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत तब्बल ५ तास अर्ध्या सिडकोचा वीजपुरवठा बंद होता. दरम्यान, महावितरणने दुरुस्तीचे काम हाती घेत वीजपुरवठा सुरु केला. परंतू सोमवारी दुपारपर्यंत विजेचा लपंडाव सुरुच होता.
सिडको वाळूज महानगरातील महाितवरण उपकेंद्रातून सिडकोसह तीसगाव, वडगाव कोल्हाटी, गोलवाडी, अर्धे पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, गंगापूर नेहरी, साऊथसिटी आदी भागाला वीजपुरवठा केला जातो.
या उपकेंद्रांतर्गत येणारे जवळपास १९ हजार ग्राहक आहेत. परंतु ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी महावितरणकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे या केंद्र्रांतर्गत येणाऱ्या ग्राहकांना कायम गैरसोयीचा सामना करावा लागतो. वीजपुरवठा सारखा खंडित होतो. परंतू परिसर मोठा असल्याने व कर्मचारी कमी असल्याने खंडित झालेला वीजपुरवठा लवकर जोडला जात नाही. त्यामुळे ग्राहकांना तासन्तास वीज येण्याची वाट पाहत बसावे लागते.
याविषयी अनेकवेळा तक्रारी करुनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष दिले जात नाही. केबल वायर खराब झाल्याने उपकेंद्रातील विद्युत ट्रान्सफार्मर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बंद पडले. त्यामुळे या ट्रान्सफार्मरवरुन सुरु असलेल्या ग्रोथसेंटर, गुरुदक्षिणा अपार्टमेंट, माऊलीनगर, सूर्यवंशीनगर, साक्षीनगरी, स्वामी विवेकानंदनगर, स्वामी समर्थ हौ. सोसायटी, साई सहवास सोसाटी, चौधरी भूमी, तिरुमला विहार, व्यंकटेश अपार्टमेंट, सारा ईलाइट आदीसह सिडकोच्या अर्ध्या नागरी वसाहतीमधील वीजपुरवठा बंद होता. महावितरण कर्मचाºयांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम हाती घेतले.
रात्री ११ वाजेपासून शोध मोहीम राबवूनही कर्मचाºयांना दोष सापडत नव्हता. अखेर सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोष शोधण्यात कर्मचाºयांना यश आले. केबल वायरची दुरुस्ती करुन पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र, तरीही दुपारी ३ वाजेपर्यंत विजेचा लंपडाव सुरुच होता. ३ वाजेनंतर सुरळीत वीजपुरवठा सुरु झाला.
या विषयी महावितरणचे अभियंता सचिन उकंडे म्हणाले की, केबल वायरमध्ये बिघाड होऊन ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने विजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्ती करुन दुपारनंतर विजपुरवठा सुरळित सुरु केला आहे.