निम्म्या शहर बसगाड्या धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:26 AM2017-10-29T00:26:08+5:302017-10-29T00:26:20+5:30
जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत नांदेड महापालिकेला मिळालेल्या शहर बसेस चालविण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली होती़ परंतु या बससेवेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे पहिल्या काही महिन्यातच या सेवेचे तीन तेरा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले होते़ आजघडीला ३० पैकी निम्म्याहून अधिक बसेस दुरुस्तीविना धूळखात पडून आहेत़ त्यामुळे नांदेडकरांची मोठी गैरसोय होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत नांदेड महापालिकेला मिळालेल्या शहर बसेस चालविण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली होती़ परंतु या बससेवेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे पहिल्या काही महिन्यातच या सेवेचे तीन तेरा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले होते़ आजघडीला ३० पैकी निम्म्याहून अधिक बसेस दुरुस्तीविना धूळखात पडून आहेत़ त्यामुळे नांदेडकरांची मोठी गैरसोय होत आहे़
जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत नांदेडात शहर बस सेवेसाठी लालपरी मिळाली होती़ ही सेवा चालविण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्तीही केली होती़ परंतु नफ्यात चालणारी ही सेवा कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे बंद पडली़ त्यानंतर हे काम अकोल्याच्या एका कंपनीला देण्यात आले़ अकोल्याच्या कंपनीवर तर लालपरी भंगारात काढण्याची वेळ आली़ त्यानंतर मिळालेल्या ३० बसेस महापालिकेने एसटी महामंडळाला चालविण्यासाठी दिल्या़
परंतु अगोदरच कर्मचाºयांची अपुरी संख्या असलेल्या महामंडळाने उसने अवसान आणून ही जबाबदारी स्विकारली़ परंतु पहिल्या काही महिन्यातच या बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे एक-एक बस दुरुस्तीच्या नावाखाली डेपोत जमा होण्यास सुरुवात झाली़ महामंडळाकडून अनेकवेळा मनपाला पत्रव्यवहार करुन ही बससेवा तोट्यात चालल्याचे कळविण्यात आले़ तर मनपाकडून मात्र महामंडळाच्या चुकांवर बोट ठेवण्यात येत आहे़ या वादात शहर बससेवेचे दिवाळे निघाले़ आजघडीला ३० पैकी १५ हून अधिक बसेस दुरुस्तीच्या नावाखाली डेपोत धूळखात आहेत़
रेकॉर्डवर १५ ते १६ बसेस रस्त्यावर धावतात असे दाखविण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात ही संख्या ६ ते ७ एवढीच आहे़ त्यामुळे नांदेडकरांना नाईलाजाने आॅटोने अधिक पैसे मोजून प्रवास करण्याची वेळ येते़ रेल्वेस्टेशन ते सिडको, हडको, विद्यापीठ या मार्गावर विद्यार्थी संख्या आणि नागरीकांची मोठी गर्दी असते़ परंतु या मार्गावरही मोजक्याच बसेस सोडण्यात आल्या आहेत़ या सर्व प्रकारात नांदेडकरांची प्रचंड गैरसोय होत आहे़