वातावरण बदलामुळे अर्धे शहर पडले आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:41 PM2019-08-03T14:41:16+5:302019-08-03T14:45:32+5:30

खाजगी रुग्णालये हाऊसफुल, लहान मुलांनाही फटका

Half a city falls ill due to climate change | वातावरण बदलामुळे अर्धे शहर पडले आजारी

वातावरण बदलामुळे अर्धे शहर पडले आजारी

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात साथ रोगांचे थैमान  महापालिकेने पुन्हा एकदा तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या

औैरंगाबाद : रिमझिम पाऊस, दिवसभर आभाळ या वातावरणामुळे शहरात साथरोगांनी थैमान घालायला सुरुवात केली आहे. अर्ध्याहून अधिक शहर आजारी पडले आहे. महापालिकेचे ३२ आरोग्य केंदे्र, खाजगी दवाखान्यांची ओपीडी हाऊसफुल होत आहे. लहान मुलांनाही या व्हायरलने घेरले असून, पोटात इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. काही भागांत महापालिकेच्या कृपेने दूषित पाणीपुरवठा होत असल्याने डायरियाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापालिकेने पुन्हा एकदा तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

७ जूनला पावसाळ्याला सुरुवात झाली. ८ आॅगस्ट तोंडावर असताना शहरात एकही मोठा धो-धो पाऊस झालेला नाही. मागील दोन महिन्यांपासून निव्वळ पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. आठ दिवसांपासून तर दररोज आभाळ भरून येते. दिवसरातून दोन-चार वेळेस रिमझिम पाऊस येतो आणि निघून जातो. या विचित्र वातावरणामुळे शहरात साथरोगांनी पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक घरात एक तरी रुग्ण व्हायरल फिवरने अंथरुणाला खिळल्याचे दिसून येत आहे. काही कुटुंबांमध्ये तर सर्वच सदस्य आजारी पडले आहेत. जुन्या शहरातील औरंगपुरा परिसरात डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. एकाच ठिकाणचे हे रुग्ण नसून आसपासच्या परिसरातीलही आहेत. डेंग्यूसदृश तापाने फणफणलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ताप असलेल्या रुग्णांना चिकुनगुनियासारख्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. कितीही औषध गोळ्या घेतल्या तरी ताप कमी होत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत. ज्या भागांत डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाने सूचना दिली आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित बंद करावे, असेही सांगितले आहे.


ओपीडी हाऊसफुल
शहरातील सर्व छोट्या-मोठ्या रुग्णालयांमधील ओपीडी सकाळी आणि संध्याकाळी हाऊसफुल होत आहे. एका रुग्णालयामध्ये किमान १०० पेक्षा अधिक रुग्ण येत आहेत. महापालिकेच्या ३२ आरोग्य केंद्रांचीही अवस्था तशीच आहे. सकाळी ९ वाजताच अनेक 
ठिकाणी रुग्णांची लांबलचक रांग लागत आहे. 

नऊ आरोग्य अधिकारी नेमले
ज्या भागात सर्वाधिक गरज आहे, तसे स्पॉट निवडून आरोग्य विभागाने शनिवारपासून शिबीर घेण्याचे निश्चित केले आहे. ओपीडी खूप वाढली आहे. एखाद्या विशिष्ट भागात साथरोगाचा उद्रेक झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. सावधगिरी म्हणून व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नऊ स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक या कामासाठी केली आहे.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा


पोटाचे इन्फेक्शन
१ वर्षाच्या आतील मुलांना पोटाचे इन्फेक्शन होत आहे. हा आजारही व्हायरलमध्येच मोडतो. लहान मुलांना सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाणही वाढले आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये सकाळी ओपीडी १२० रुग्णांपर्यंत जात आहे. ढगाळ वातावरणामुळे व्हायरल आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून, रुग्णांवर त्यादृष्टीनेच उपचार करण्यात येत आहेत.
-डॉ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ


शिबीर घेण्याची सूचना
शहरातील विविध डेंजर झोनमध्ये सकाळ, संध्याकाळ धूरफवारणी, औषध फवारणी, अ‍ॅबेट ट्रीटमेंट, सर्वेक्षण करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली आहे. शहरातील मनपाच्या नऊ झोनमध्ये आरोग्य शिबीर घेण्याची सूचना दिली आहे. आणीबाणी समजून आरोग्य विभाग कामाला लागला आहे. 
- नंदकुमार घोडेले, महापौर

 

Web Title: Half a city falls ill due to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.