अर्धे शहर कचरामुक्तचा दावा फोल; महानगरपालिकेचे पितळ उघडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:01 PM2018-10-04T12:01:16+5:302018-10-04T12:12:55+5:30

कोणताच वॉर्ड कचरामुक्त झालेला नाही. वॉर्डांमध्ये आजही कचरा पडूनच आहे. मात्र, महापालिकेने अर्धे शहर कचरामुक्त केल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

Half the city trash-free claim was false | अर्धे शहर कचरामुक्तचा दावा फोल; महानगरपालिकेचे पितळ उघडे 

अर्धे शहर कचरामुक्तचा दावा फोल; महानगरपालिकेचे पितळ उघडे 

googlenewsNext
ठळक मुद्देफसवणूक नेमकी कोणाची स्वत:ची पाठ थोपटून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना काय साध्य करायचे ?

लोकमत चमू : मुजीद देवणीकर, विकास राऊत, साहेबराव हिवराळे, राम शिनगारे, शेख मुनीर, सचिन लहाने

औरंगाबाद : राज्य शासनाने महापालिकेला ९० कोटी रुपये देऊन आठ महिने उलटले तरी अद्याप कचऱ्याचा प्रश्न किंचितही सोडविता आलेला नाही. शहरातील प्रत्येक वॉर्डात, सार्वजनिक रस्ते, दुभाजकांमध्ये कचऱ्याचे अक्षरश: डोंगर साचले असताना महापालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी तब्बल ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. ‘लोकमत’ चमूने बुधवारी मनपाने जाहीर केलेल्या ५१ वॉर्डांपैकी मोजक्याच वॉर्डांची पाहणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले. कोणताच वॉर्ड कचरामुक्त झालेला नाही. वॉर्डांमध्ये आजही कचरा पडूनच आहे. मात्र, महापालिकेने अर्धे शहर कचरामुक्त केल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

शहरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची सवय लावा, वॉर्डातील ओला कचरा वॉर्डात कंपोस्ट पद्धतीने जिरवा, कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारावीत, असे राज्य शासनाने सांगितले. यानंतर खंडपीठानेही सूचना दिली. महापालिका काहीच करायला तयार नाही. उलट अर्धे शहर कचरामुक्त केल्याची घोषणा करून औरंगाबादकरांची फसवणूक सुरू केली आहे. हा खोटारडेपणा मांडण्यासाठी महापालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औैचित्य शोधावे का? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून दिल्ली आणि इतर शहरांमधून काही खाजगी संस्थांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही निविदा प्रक्रियेविना जनजागृतीचे काम सोपविले आहे. या संस्थांनी जिथे-जिथे थोडेफार काम केले त्या वॉर्डांना चक्क कचरामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ज्या ५१ वॉर्डांची कचरामुक्त म्हणून घोषणा झाली आहे, त्या वॉर्डांतील नागरिक, नगरसेवक आणि मनपा प्रशासनालाही वस्तुस्थितीची जाणीव आहे..

कुठे गेले प्रक्रिया केंद्र
चिकलठाणा, पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. कंत्राटदार नियुक्त करून दोन महिने झाले तरी  मनपाला अद्याप साधा नारळ फोडता आला नाही. ३६ कोटी रुपये अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यास, ७ वर्षे प्रक्रिया केंद्र चालविण्यासाठी देण्यात आले आहेत. २६ कोटी रुपये देऊन निव्वळ शेड उभारण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. मागील आठ महिन्यांत मनपाला साधे शेड उभारता आले नाहीत. यापेक्षा शहराचे दुसरे दुर्दैव असूच शकत नाही. महापालिकेच्या या भोंगळ कारभारासमोर राज्य शासनानेही हात टेकले, हे विशेष.

काही वॉर्ड अपवाद असतील...
५१ पैकी ५१ वॉर्डांमध्ये कचऱ्याचे डोंगर असू शकत नाहीत. पूर्वीसारखा कचरा आता कुठेच नाही. काही ठिकाणी आज किंवा कालपासून कचरा उचलला नसेल असे दृश्य बघायला मिळू शकते. मनपाकडून कचरा उचलण्यास दिरंगाई झाली असेल. एखाद्या वॉर्डात अपवादाने कचरा सापडू शकतो. महापालिकेने मागील काही दिवसांमध्ये रात्रं-दिवस डोळ्या तेल घालून काम केले. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या काढून तेथे रांगोळ्या, वृक्षारोपण केले. आता तेथे नागरिक कचरा टाकत नाहीत. सकाळी घंटागाडीतच कचरा टाकतात. हा सकारात्मक बदल नक्कीच झाला आहे.
-नंदकुमार घोडेले, महापौर

आम्ही कौतुकाची थाप दिली...
शहरातील ११५ पैैकी ५१ वॉर्डांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेत भाग घेतला. वॉर्डातील नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, महिलांनी स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग घेतला. अनेक वसाहती हळूहळू कचरामुक्त झाल्या आहेत. आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी आदी ठिकाणी महिला स्वत:हून पुढे आल्या आहेत. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करीत आहेत. स्वच्छतेसाठी पुढाकार घेतलेल्या वॉर्डांना आम्ही फक्त कौैतुकाची थाप दिली. काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात कचरा असू शकतो. आजच कचरा उचलला नसेलही. यात आणखी सुधारणा करण्यात येणारच आहे.
-डॉ. निपुण विनायक, आयुक्त

Web Title: Half the city trash-free claim was false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.