अर्ध्या शहरात पावसाने उडविली दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:04 AM2021-06-05T04:04:06+5:302021-06-05T04:04:06+5:30
औरंगाबाद : शहरातील अर्ध्या भागात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या पावसाने दाणादाण उडविली. जयभवानीनगर, परिजातनगर, मेहेरनगर, बीडबायपास परिसरात जोरदार ...
औरंगाबाद : शहरातील अर्ध्या भागात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या पावसाने दाणादाण उडविली. जयभवानीनगर, परिजातनगर, मेहेरनगर, बीडबायपास परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडविली.
अग्निशनम दलाकडे सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांपासूनच घरांमध्ये, दुकानात पाणी शिरल्याप्रकरणी फोन येण्यास सुरूवात झाली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार परिजातनगर परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे सर्व साहित्यासह बंब रवाना करण्यात आला. त्यानंतर गारखेडा परिसरातील वसाहतींमध्ये ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर मदतकार्यासाठी जवान पोहोचले. बीडबायपास परिसरात जोरदार पाऊस झाला. बायपासवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहने आहे तेथेच थांबली होती.
मेहेरनगरमधील साहस सोसायटीत पाणीच पाणी
मेहेरनगर वॉर्डातील साहस सोसायटीमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात घरात शिरल्यामुळे शुक्रवारी अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. माजी नगरसेवक राजू वैद्य यांनी फायर ब्रिगेडचा पंप व्हॅक्यूम क्लिनर पंप बोलावून घेतले. नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचले होते. सिमेंट रस्ते बांधताना पावसाळ्यात होणाऱ्या परिणामांचा काहीच विचार न केल्याने दरवर्षी त्या भागात त्रास होतो आहे. याबाबत आयुक्तांना पत्र देऊन या भागातील हा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याच्या दृष्टीने उद्या मागणी करणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले. वॉर्ड अधिकारी कमलाकर न्याते, उपअभियंता राजेंद्र वाघमारे, राजू सुरे, राम केकाण आदींनी नागरिकांना सहकार्य केले.