सहा हजार मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हासू!
By Admin | Published: July 19, 2015 12:43 AM2015-07-19T00:43:38+5:302015-07-19T00:58:32+5:30
लातूर : दुभंगलेले ओठ आणि टाळू असे जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलांवर दररोज मोफत शस्त्रक्रियेचा यज्ञ गेली दहा वर्ष अखंड चालू आहे़
लातूर : दुभंगलेले ओठ आणि टाळू असे जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलांवर दररोज मोफत शस्त्रक्रियेचा यज्ञ गेली दहा वर्ष अखंड चालू आहे़ डॉ़ विठ्ठल लहाने यांनी ‘स्माईल ट्रेन’ या जागतिक संस्थेच्या मतदतीने लातुरात सुरु केलेल्या या यज्ञात ६ हजार १५० मुलांच्या चेहऱ्यावर हासू फुलले आहे़ देवाने केलेली चूक विठ्ठलाने दुरुस्त केली़, अशी कृतज्ञता डॉक्टरांप्रती या मुलांच्या पालकांनी सर्जरीनंतर व्यक्त केली़ दररोज दोन ते तीन आणि वर्षभरात ६५० ते ७०० सर्जरीचा उपक्रम दहा वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे़ परिणामी, या बालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे़
मुंबईच्या ग्रँट मेडीकल कॉलेजमध्ये प्लास्टिक सर्जनचे पदव्युत्तर पदवी पूर्ण करणारे डॉ. लहाने हे डॉ. बमन डावर यांचे आवडते विद्यार्थी. शिक्षण संपल्यावर जेव्हा डॉ. लहाने यांनी मी लातुरात दवाखाना उघडणार, असे सांगितले तेव्हा डॉ. डावर चकित झाले. त्यांनी आश्चर्याने पाहून विचारले ‘लातूर?’ पण आपला शिष्य काही तरी वेगळे करणार म्हणून त्यांनी लहानेंनी मुंबईला आपल्याजवळच रहावे हा हट्ट सोडला आणि आशिर्वाद दिला. दवाखान्याच्या पहिल्या वर्धापन दिनाला काय करायचे? असा प्रश्न लहाने यांनी आपल्या सौभाग्यवती डॉ. कल्पना आणि भूलतज्ज्ञ डॉ. अजय शहा यांच्यासह साऱ्या सहकाऱ्यांसमोर मांडला. काहीतरी हटके करुयात, असे ठरविल्यानंतर मग दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शिबीर घेण्याचे ठरले. एका दिवशी शंभर पेशंट आले. एका दिवसात एवढ्या सर्जरी शक्य नव्हत्या. मग दरवर्षी हा उपक्रम होऊ लागला. चार वर्षात सत्तरएक शस्त्रक्रिया करुनही नंबर न लागणारे लोक आपल्या वर्धापन दिनाची वाट पाहतात हे डॉ. लहाने यांच्या लक्षात आले. याला कायमचे उत्तर काय ? हे शोधण्यासाठी त्यांनी नवी घोषणा केली. आपल्याकडे दुभंगलेल्या ओठ आणि टाळूवर दररोज मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. आणि गेल्या दहा वर्षात त्यांच्याकडे ‘स्माईल ट्रेन’ या संस्थेंच्या सहकार्याने तब्बल ६ हजार १५० शस्त्रक्रिया झाल्या असून, मुलांना नवा चेहरा मिळाला आहे़
किनगाव येथील दत्ता सोनवणे म्हणाले, माझ्याही मुलाचे ओठ दुभंगलेले़ बोलता आले तरी बोबडे बोलेल, अशी चिंता भेडसावत होती़ परंतु, डॉ़ विठ्ठल लहाने यांनी माझ्या मुलाची मोफत सर्जरी करुन त्याचा चेहरा नवा केला़ ते देवच आहेत़ चांगल्या माणसांकडूनच अशी सेवा घडते़
सामान्य मुलांसारखा चेहरा मिळाला़़़
४उदगीर तालुक्यातील रावणगाव येथील सय्यद मुजीब म्हणाले, माझ्या मुलाचे ओठ दुभंगलेले़ डॉ. विठ्ठल लहाने यांची महती मी ऐकलेली होती़ थेट लातूरला आलो आणि डॉक्टर साहेबांची भेट घेतली़ त्यांनी तात्काळ मोफत सर्जरीला माझ्या मुलाचा नंबर लावला़ आज तो चांगला दिसत आहे़ सामान्य मुलांसारखा बोलतो, खेळतो आहे़