अर्धा किलो सोने चोरणारे अटकेत; बुलडाण्यातून घेतले दोन आरोपींना ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:06 PM2019-02-09T12:06:53+5:302019-02-09T12:09:07+5:30
टोळीतील दोन जणांना बुलडाणा येथून गुन्हे शाखा पोलिसांनी पकडून आणले.
औरंगाबाद : समर्थनगरातील रहिवासी बँक कर्मचारी महिलेचे घर फोडून पन्नास तोळ्याचे दागिने आणि लाखाची रोकड चोरून नेणाऱ्या टोळीतील दोन जणांना बुलडाणा येथून गुन्हे शाखा पोलिसांनी पकडून आणले. या दोन संशयितांना न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
किरण सोपान चव्हाण (१९) आणि कर्मा प्रकाश पवार (२०, दोघे रा. बाराई, ता. मेहकर, जि. बुलडाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, समर्थनगर येथील व्यंकटेश अपार्टमेंटमधील रहिवासी सुनीता धर्मंेद्र पुराणिक यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ४ फेब्रुवारी रोजी भरदिवसा पन्नास तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख चोरून नेले होते.
याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पोलिसांना मदत झाली. तेव्हा ही चोरी बुलडाणा जिल्ह्यातील पाच ते सहा जणांच्या टोळीने केल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या समोर आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि कर्मचाऱ्यांचे पथक बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गेले होते. तेथे शोध घेऊन पोलिसांनी संशयित आरोपी किरण चव्हाण आणि कर्मा पवार यांना ताब्यात घेऊन औरंगाबादेत आणले.
दोन्ही आरोपींना शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख यांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध घेणे आहे. त्यांनी चोरून नेलेले पन्नास तोळ्याचे दागिने आणि रोख एक लाख रुपये जप्त करणे आहे. त्यांनी गुन्हा करण्यापूर्वी पुराणिक यांच्या घराची स्थानिक व्यक्तीच्या मदतीने रेकी केली आहे. यामुळे त्यांना या गुन्ह्यात मदत करणाऱ्यास अटक करणे आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यासाठी दोन्ही आरोपींना दहा दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून आरोपींना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दागिने विकणार होते
चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली देऊन अन्य साथीदारांच्या मदतीने ४ फेब्रुवारी रोजी ही चोरी केल्याचे सांगितले. लुटलेला माल त्यांनी आपसात वाटून घेतला होता. या मालाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पसार आरोपींनी घेतली. त्यांनी चोरून नेलेले सोन्याचे मणीमंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, कानातील रिंग, टॉप्स, अंगठ्या, सोन्याची नाणी, असा सुमारे अर्धा किलोच्या ऐवजासह पसार झाले होते. दागिने विक्री करून येणारी रक्कम आपसात वाटून घेणार असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.