निम्मा पावसाळा संपला, तरी प्रतीक्षा
By Admin | Published: August 8, 2016 12:21 AM2016-08-08T00:21:21+5:302016-08-08T00:27:09+5:30
औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे.
औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यावरही विभागातील लघु प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी २३ टक्के आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. मराठवाड्यातील सुमारे ७५ टक्के लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अजूनही जोत्याच्याच जवळपास आहे.
मराठवाड्यातील पाणीसाठा यंदा पूर्णपणे संपला होता. त्यामुळे एप्रिलपासूनच मराठवाड्यातील हजारो गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विभागातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली.
विभागातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आठवडाभरात तब्बल ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे; परंतु असे असले तरी आतापर्यंत झालेला पाऊस पाहता उर्वरित धरणांमध्ये पुरेसे पाणी आलेले नाही. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. परंतु आतापर्यंत धरणांमध्ये पन्नास टक्केही साठा झालेला नाही.
मराठवाड्यात एकूण ७३२ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी १७ टक्के इतकाच पाणीसाठा होऊ शकला आहे. वरीलपैकी तब्बल ४९६ सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.
नांदेड जिल्ह्यात मात्र ८० पैकी ४९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांच्या परिस्थितीतही फारशी सुधारणा झालेली नाही. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ दहा प्रकल्पांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा होऊ शकला आहे. या दहा प्रकल्पांत नांदेड जिल्ह्यातील चार प्रकल्पांचा समावेश आहे.