निवृत्त एसपीच्या घरी चोरट्यांची आधी पार्टी, मग चोरी

By Admin | Published: July 16, 2016 12:57 AM2016-07-16T00:57:42+5:302016-07-16T01:18:28+5:30

औरंगाबाद : चार दिवसांपासून शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र वाढले आहे.

Half of the retired SP's thieves party, then theft | निवृत्त एसपीच्या घरी चोरट्यांची आधी पार्टी, मग चोरी

निवृत्त एसपीच्या घरी चोरट्यांची आधी पार्टी, मग चोरी

googlenewsNext

औरंगाबाद : चार दिवसांपासून शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र वाढले आहे. सुराणानगर येथील व्यापाऱ्याचे घर फोडून ९ लाखांचा ऐवज पळविल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पारिजातनगर येथे राहणाऱ्या निवृत्त पोलीस अधीक्षकांचे घर फोडले. या घटनेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, दहा किलोच्या चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम, असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी येथे नुसती चोरीच केली नाही, तर ‘पार्टी’ही केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बड्या माजी पोलीस अधिकाऱ्याचेच घर जेथे सुरक्षित नाही, तेथे सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-३ परिसरातील पारिजातनगर येथील रहिवासी एच. आर. जाधव हे पोलीस अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या मुलीची प्रकृती ठीक नसल्याने ते त्यांचा मुलगा महेश आणि परिवारातील सदस्यांसह १२ जुलै रोजी दुपारी पुणे येथे गेले होते. गावी जाताना त्यांनी मोलकरीण मधू यांच्याकडे घराच्या चाव्या दिल्या. १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मधू या जाधव यांच्या घरी गेल्या तेव्हा गेट आणि मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. ही बाब त्यांनी तात्काळ जाधव यांना फोन करून सांगितली. जाधव यांनी त्यांचे चुलतभाऊ श्याम जाधव यांना घरी जाऊन काय झाले ते पाहण्यास सांगितले. त्यामुळे श्याम जाधव तेथे गेले असता चोरट्यांनी कडीकोंडा तोडून चोरी केल्याचे आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे आढळले. त्यानंतर महेश जाधव हे तातडीने औरंगाबादला परतले. १४ रोजी सायंकाळी त्यांनी पाहिले असता चोरांनी ७६ हजार रुपये किमतीचे दागिने, ३ लाख रुपये किमतीच्या देवघरातील सुमारे दहा किलोच्या चांदीच्या दोन समया, ग्लास, वाटी, चमचा, ताट आणि अन्य साहित्य, तसेच रोख दहा हजार रुपये, असा सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांना समजले. १४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी याबाबत तक्रार पुंडलिकनगर पोलिसांकडे नोंदविली.
चोरट्यांनी दारूही ढोसली आणि पापडही भाजून खाल्ले...
महेश जाधव हे घरी येणार नाहीत, याबाबतची माहिती चोरट्यांना असावी, अशा प्रकारे चोरट्यांनी तेथे बिनधास्तपणे चोरी केल्याचे घटनास्थळावरून दिसून येते. चोरट्यांनी जाधव यांच्या घरात चोरी करताना तेथे दारू प्राशन केली आणि दारू पिताना त्यांनी ‘चकणा’ म्हणून पापड भाजून खाल्ल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी स्वयंपाकघरात चहा उकळून प्यायल्याचे आढळले. चोरट्यांनी गुटखा खाऊन तेथेच पिचकाऱ्या मारल्या, बिड्याही ओढल्या. घटनास्थळी दारूची रिकामी बाटली, गुटख्याचे रिकामे पाऊच, बिडीचे थोटूक आणि चहाचे पातेले, चहापत्ती तशीच ठेवून ते निघून गेले.

Web Title: Half of the retired SP's thieves party, then theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.