महिला एसटी चालकांच्या हातचे स्टिअरिंग केले ‘जाम’; निवड प्रक्रिया अर्ध्यावरच थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 02:23 PM2021-02-15T14:23:16+5:302021-02-15T14:26:42+5:30
एसटी महामंडळाने महिलांच्या हाती बसचे स्टिअरिंग देण्याचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात १६३ महिला चालक तथा वाहकांची निवड केली.
औरंगाबाद : राज्यातील एसटीनेमहिला सक्षमीकरण आणि मनोधैर्य वाढविण्याचा मोठा गाजावाजा करून महिला चालकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात आली. विभागात ३२ महिलांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले होते; परंतु कोरोनाच्या नावाखाली प्रशिक्षण स्थगित करून महिलांच्या हाती येणारे एसटीचे स्टिअरिंगच ‘जाम’ केले गेले आहे.
एसटी महामंडळाने महिलांच्या हाती बसचे स्टिअरिंग देण्याचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात १६३ महिला चालक तथा वाहकांची निवड केली. या महिलांना पुणे येथे २३ ऑगस्ट २०१९ ला बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या समारंभात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. देशातील पहिला उपक्रम ज्यातून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत असल्याचा गाजावाजा केलेल्या या उपक्रमाला मोठी प्रसिद्धीही मिळाली.
सुरुवातीला पुण्यातील भोसरी येथील प्रशिक्षण केंद्रात आणि त्यानंतर त्यांच्या विभाग अथवा जिल्हास्तरावर अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. औरंगाबाद आणि नाशिक प्रदेशासाठी चालकपदासाठी ३२ महिलांच्या निवडीत औरंगाबाद विभागातील ६ महिलांचा समावेश होता. त्यानंतर कोरोनाच्या नावाखाली एसटी महामंडळाने १७ जुलै रोजी एका पत्राद्वारे सरळसेवा भरतीअंतर्गत चालक तथा वाहकांचे प्रशिक्षण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची सूचना विभाग नियंत्रकांना केली. त्यानुसार औरंगाबादेत प्रशिक्षण थांबविण्यात आले आहे. मात्र, हातचा कामधंदा सोडून प्रशिक्षण घेणाऱ्या महिला आता चिंतेत असून, प्रशिक्षण पुन्हा कधी सुरू होईल, याची विचारणा करत आहेत.
विभागात ३२ महिलांना प्रशिक्षण
निवड झालेल्या ३२ महिलांचे ३ फेब्रुवारी २०२० पासून औरंगाबादेत जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर या सर्व महिला एसटीचालक म्हणून रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रशिक्षणात विभागातील ६ महिलांचा समावेश होता. त्यानंतर कोरोनाकाळात जुलै २०२० मध्ये एका परिपत्रकाद्वारे हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले. काही कालावधीनंतर झालेली निवडच रद्द होण्याची अन् एसटीत चालक म्हणून रुजू होण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाण्याची भीती निवड झालेल्या महिला उमेदवारांतून व्यक्त होत आहे.
एसटीत चालक म्हणून रुजू होणार म्हणून खूप आनंद झाला होता. अनेकांनी कौतुक केले; पण प्रशिक्षण अर्धवटच राहिले. त्यामुळे बसचालक होण्याचे स्वप्नही अधुरेच राहिले. महामंडाळाने प्रशिक्षण पुन्हा सुरू करावे.
- एक महिला चालक
उच्चशिक्षित मुलींनी हातातील कामधंदा सोडून प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. प्रशिक्षण मध्येच थांबवायला नको होते. हे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यात यावे. मुलींना या पदावर काम करण्याची खूप उत्सुकता आहे.
-अरुणा चिद्री, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
औरंगाबादेत ३२ महिलांचे चालक प्रशिक्षण सुरू होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार महिला चालक प्रशिक्षण थांबवले. पुन्हा आदेश येताच प्रशिक्षण सुरू होईल.
-बाळकृष्ण चंदनशिवे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी,
८ : जिल्ह्यातील आगार
५५० : बसेसची संख्या
१,२०१ : एकूण बसचालक
९३४ : एकूण बस वाहक