मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा उभारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 06:53 PM2019-07-23T18:53:02+5:302019-07-23T18:58:43+5:30
काकासाहेब शिंदे यांच्या पहिला स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
कायगाव (जि. औरंगाबाद) : मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा सोमवारी रात्री काही कार्यकर्त्यांनी गोदावरीच्या पुलावर उभारला. मंगळवारी (दि. २३) काकासाहेब शिंदे यांचा पहिला स्मृतिदिन असल्याने विविध कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या वर्षी आजच्या दिवशी जुने कायगाव येथील गोदावरी नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा वतीने देण्यात आला होता. त्यानुसार २३ जुलै २०१८ रोजी काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पुलाच्या मध्यभागी येऊन गोदावरी नदीत उडी घेतली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्षे पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जुने कायगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी सोमवारी रात्री काही कार्यकर्त्यांनी औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गातील नदीवरील पुलावर काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. विटा-सिमेंटचा चबुतरा तयार करून त्यावर पुतळा बसविण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या आंदोलन दरम्यान या पुलाला हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू असे नामकरण करण्यात आले होते.
आजच्या नियोजित कार्यक्रमामूळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक बिडकीन- पैठण मार्गे वळविण्यात आली आहे. परजिल्हातून येणाऱ्या जड वाहतूकदारांना पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याचे माहिती नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जडवाहतुक औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय मार्गावर भेंडाळा फाटा येथे थांबविण्यात आली होती. पोलिसांनी तेथेच बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता.
जुने कायगावला पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. दंगा काबू पथकाच्या तीन गाड्या, १ वरुन वॉटर पॅनल, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, १३ उपनिरीक्षक, आणि सुमारे २५० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, तसेच अग्निशमनचे वाहन आणि पंधरा जणांचे पथक, नदीच्या पात्रात एक बोट अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करून ठेवण्यात आली आहे