अर्धे वर्षे सरले तरी निधी वाटप होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:41 PM2017-10-04T23:41:01+5:302017-10-04T23:41:01+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी दिला जाणारा निधी अर्धे वर्षे सरले तरी बहुतांश यंत्रणांना वितरित झालेला नाही़ त्यामुळे उरलेल्या अर्ध्या वर्षात निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे़
प्रसाद आर्वीकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी दिला जाणारा निधी अर्धे वर्षे सरले तरी बहुतांश यंत्रणांना वितरित झालेला नाही़ त्यामुळे उरलेल्या अर्ध्या वर्षात निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे़
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, कृषी, रोजगार आदी घटकांच्या विकास कामांसाठी निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या निधीला मंजुरी देवून तो संबंधित यंत्रणेद्वारे खर्च केला जातो़ यासाठी जिल्हा नियोजन समितीची कार्यकारिणी मंजुरीचे काम करीत असते़ परभणी जिल्ह्यात एप्रिल २०१७ पासून नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला़ यावर्षासाठी १४१ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ त्यामुळे हा निधी विविध यंत्रणांना वितरित करून कामांना प्रारंभ होणे अपेक्षित होते़ मात्र आॅक्टोबर महिना उजाडला तरीही अनेक यंत्रणांना निधीचे वितरण झालेले नाही़ जिल्ह्यातील यंत्रणांनी निधीसाठी प्रस्ताव दाखल करणे गरजेचे असते़ अशा यंत्रणांकडून प्रस्तावच आले नसल्याने निधीचे वितरण रखडले आहे़ सहा महिन्यांमध्ये काही बोटावर मोजण्या इतक्याच यंत्रणांना निधी वितरित झाला आहे़ त्यात रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, लघु पाटबंधारे विभाग या विभागांना काही प्रमाणात निधी वितरित झाला असून, उर्वरित सर्व यंत्रणांच्या निधी वितरणाचे काम प्रक्रियेत आहे़ मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यातील यंत्रणांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्याविषयी उदासिन भूमिका राहिली आहे़ एप्रिल, मे महिन्यात निधीदेवूनही संपूर्ण वर्षभरात निधी खर्च होत नसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत़ यावर्षी तर आॅक्टोबर महिना उजाडला तरी यंत्रणांना निधीच वितरित झालेला नाही़ त्यामुळे यापुढे यंत्रणांचे प्रस्ताव कधी दाखल होतील आणि केव्हा या यंत्रणा विकास कामे करतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यामुळे विकास कामांसाठी निधीची तरतूद असतानाही कामे मात्र ठप्प आहेत.