'पीआरएन' नव्हे, हॉल तिकीटच परीक्षेसाठी बंधनकारक
By राम शिनगारे | Published: March 28, 2024 03:33 PM2024-03-28T15:33:54+5:302024-03-28T15:34:44+5:30
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून पदवी, पदव्युत्तरसाठी नियमावली जाहीर
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकीट नसल्यास ऐन वेळी कायमस्वरूपी नोंदणी क्रमांकावर (पीआरएन) परीक्षा देण्याचा पायंडाच पडला होता. हा पायंडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बंद करीत हॉल तिकीट असल्याशिवाय परीक्षा देता येणार नसल्याची नियमावलीच तयार केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा येत्या २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. चार जिल्ह्यांतील २७५ केंद्रांवर परीक्षा होणार असून, ३७ भरारी पथकांची स्थापना केली आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सहकेंद्रप्रमुखांची नियुक्ती केली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सहकेंद्रप्रमुख रुजू होण्यास अडचणी असतील, अशा परीक्षा केंद्रावर त्याच महाविद्यालयातील एका प्राध्यापकास सहकेंद्रप्रमुख नियुक्त करण्यासंबंधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना केल्या आहेत. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्यासाठी जिल्हानिहाय ३७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास, अशा परीक्षा केंद्रावर तातडीने कारवाई करण्यात येईल. उन्हाळी २०२४ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हानिहाय १६ मूल्यांकन आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ८ मूल्यांकन केंद्रे निश्चित केल्याचे संचालक डॉ. गवळी यांनी सांगितले.
अशी असणार परीक्षेत नियमावली
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर केली आहे. त्यात परीक्षा केंद्रात मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट केंद्रप्रमुख वगळता कोणालाही वापरता येणार नाहीत. संबंधित महाविद्यालयाकडून हॉलतिकिटांचे वितरण विहित वेळेत होणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यास पीआरएन नंबरवर परीक्षा देण्यासाठी परवानगी मिळणार नाही. पीआरएनवर परीक्षा दिल्यास त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येईल, याची नोंद घ्यावी. विद्यार्थी उपस्थिती व अनुपस्थिती अहवाल, गैरप्रकाराची माहिती तत्काळ विद्यापीठास ऑनलाईन पद्धतीने पाठवावी लागणार आहे.
मोबाइलचा वापर करू नये
प्रश्नपत्रिका डाउनलोड करणारे शिक्षक, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त स्ट्रॉंगरूमध्ये मोबाइलचा वापर करू नये. केंद्रावर परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास केंद्रांच्या प्राचार्य, केंद्रप्रमुखांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा विभाग