आईला रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीलाच जोडली हातगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:02 AM2021-05-30T04:02:11+5:302021-05-30T04:02:11+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : दुचाकीला जोडलेली हातगाडी... त्या हातगाडीला लटकलेली वैद्यकीय उपचाराची पिशवी अन् हातगाडीवर कोणीतरी महिला... एक जण ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दुचाकीला जोडलेली हातगाडी... त्या हातगाडीला लटकलेली वैद्यकीय उपचाराची पिशवी अन् हातगाडीवर कोणीतरी महिला... एक जण दुचाकी चालवीत होता, तर दुसरा उलटा बसून हाताने हातगाडी धरून होता... अशा स्थितीत क्रांतीचौकातून पैठणगेट रस्त्यावर ते पोहोचले; पण अचानकच हातगाडीचे चाक मोडले. रणरणत्या उन्हात या स्थितीत भररस्त्यावर थांबावे लागले; पण काही वेळातच त्यांना रुग्णवाहिकारूपी मदतीचा हात मिळाला आणि ते आईला घेऊन रवाना झाले. नियमित उपचारासाठी आईला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी दोन भावांची ही धडपड होती.
एकनाथनगर येथील रहिवासी दोन भावांच्या आईला कर्करोगाचे निदान झाले. त्यातच पॅरॅलिसिसमुळे आईला हालचाल करणेही अशक्य झाले. अशा परिस्थितीत आईला कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्णालयात नियमितपणे घेऊन जावे लागते. त्यावेळी रुग्णवाहिकेत उचलून ठेवताना आणि परत बाहेर काढताना आईला त्रास सहन करावा लागतो व यासाठी दरवेळी तीन ते चार जणांची मदत घ्यावी लागते. शिवाय रुग्णवाहिकेचे भाडेही द्यावे लागते. या सगळ्यावर मार्ग निघून आईला रुग्णालयात नेताना कमीत कमी त्रास होईल, यासाठी वेल्डिंगचे काम करणाऱ्या दोन भावांपैकी एकाने लोखंडी हातगाडी तयार केली. या हातगाडीत आईला ठेवून ते शनिवारी शासकीय कर्करोग रुग्णालयाकडे जात होते. दुचाकी आणि त्यापाठीमागे हातगाडीवरून कोणाला तरी घेऊन जात असल्याची स्थिती पाहून रस्त्यावरील काही जण क्षणभर जागेवरच स्तब्ध होत होते.
क्रांतीचौकाकडून पैठणगेटपर्यंत पोहोचेपर्यंत हातगाडीच्या एका चाकाचे स्पोक तुटले. त्यामुळे हातगाडीवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. अखेर पैठणगेटवर भररस्त्यात थांबावे लागले. ही स्थिती पाहून बंदोबस्तावरील पोलीस आणि परिसरातील नागरिकांनी विचारपूस करीत मदतीसाठी धाव घेतली.
‘लोकमत’ने दिला मदतीचा हात
दोन भावांची आईला रुग्णालयात नेण्यासाठी सुरू असलेली धडपड ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या निदर्शनास पडली. त्यानंतर त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीत मदतीचा हातही दिला. भावनिक ॲम्ब्युलन्स ग्रुप आणि के.के. ग्रुपला यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटांतच पैठणगेटवर रुग्णवाहिका पोहोचली. तेथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारानंतर घरीही सोडण्यात आले.
फोटो ओळ...
१) अशा प्रकारे दोन्ही भाऊ आईला रुग्णालयात घेऊन निघाले होते.
२) पैठणगेट रस्त्यावर हातगाडीचे चाक तुटले.
३) रुग्णवाहिकेतून आईला रुग्णालयात नेण्यात आले.