तरुणीचा मोबाईल हिसकावणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या
By राम शिनगारे | Published: September 13, 2022 05:08 PM2022-09-13T17:08:11+5:302022-09-13T17:08:34+5:30
तरुणीच्या कानाला लावलेला मोबाईल बळजबरीने हिसकावून पळून गेला होता.
औरंगाबाद : कार्यालयातून घरी पायी चालत जाणाऱ्या तरुणीचा मोबाईल हिसकावून रिक्षाचालक पसार झाला होता. या तरुणीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील बळजबरीने मोबाईल चोरणाऱ्या रिक्षाचालकाला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
अजय कल्याण सोनवणे (२२, रा. गल्ली नं.१, हमालवाडा, रेल्वेस्टेशन) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. एपीआय कॉर्नर परिसरात १० सप्टेंबर रोजी एक तरुणी कार्यालयीन कामकाज संपवून घरी पायी चालत येत होती. तेव्हा ती कानाला मोबाईल् लावून बोलत होती. तेव्हा रिक्षाचालक अजय सोनवणे हा रिक्षा (एमएच २० २० ईके ०११८) जवळ घेऊन आला. त्याने तरुणीच्या कानाला लावलेला मोबाईल बळजबरीने हिसकावून पळून गेला. तरुणीला लुटणारा चालक हा रेल्वेस्टेशन परिसरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास मिळाली. त्यानुसार सापळा लावून सोनवणे यास पकडण्यात आले.
आरोपीकडून चोरलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक फौजदार शेख हबीब, हवालदार विजय निकम, राजेंद्र साळुंके, संजय गावंडे, संजय मुळे, संदीप सानप, नितीन देशमुख यांनी केली.