पोलीस दिसले अन् फासे पलटले; विद्यार्थ्यांना लुटून मोबाईलसाठी खंडणी मागणाऱ्या दोघांना बेड्या
By राम शिनगारे | Published: July 29, 2022 07:07 PM2022-07-29T19:07:34+5:302022-07-29T19:07:56+5:30
विद्यार्थ्यांना लुटून खंडणी मागणाऱ्या दोघांना वेदांतनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
औरंगाबाद : कॉलेजहून घरी जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी हिसकावून पळ काढला. त्या मोबाइलवर विद्यार्थ्याने फोन केला असता मोबाइल पाहिजे असेल, तर ३ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. याविषयी विद्यार्थ्यांनी वेदांतनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मोबाइल लुटून पैसे मागणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.
धनंजय प्रभाकर बोर्डे (२९, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), सिद्धार्थ सुनील गवई (२२, रा. लालमाती, भावसिंगपुरा) असे आरोपींची नावे आहेत. अनिकेत अरविंद पाडसे (रा. लासूर स्टेशन, गंगापूर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, अनिकेत पाडसे हा देवगिरी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेतो. सोमवारी कॉलेज संपल्यानंतर अनिकेत व त्याच्यासोबत अन्य दोन मित्र लासूर स्टेशनला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे पायी चालत जात हाेते. वेदांतनगर भागातील हॉटेल व्हिटसजवळून जात असताना बोर्डे व गवई हे दुचाकीवर आले. त्यांनी अनिकेत पाडसे याच्या हातातून मोबाइल हिसकावून पळ काढला. ही घटना घडल्यानंतर अनिकेतसोबत असलेल्या मित्राने अनिकेतच्या मोबाइलवर फोन लावून माझा मोबाइल असल्याचे सांगितले. त्यावर आरोपींनी मोबाइल हवा असेल, तर तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे स्पष्ट केले. तसेच पैसे घेऊन गाडे चौकात येण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थी गाडे चौकात जाण्यास निघाले.
पोलीस दिसले अन् फासे पलटले
देवगिरी महाविद्यालयाजवळ विद्यार्थ्यांना वेदांतनगर ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी दिसले. त्यांनी पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी अनिकेत व त्याच्या मित्रांना गाडे चौकाकडे जाण्यास सांगितले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांचा पाठलाग केला. विद्यार्थी आरोपीजवळ पोहोचल्यानंतर त्यांना झडप मारून पकडले. ही कामगिरी निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, उपनिरीक्षक प्रमोद देवकाते, अंमलदार संदीप प्रधान, मट्टलवार, जारवाल, आडे आणि जमीर तडवी यांनी केली.