पिता-पुत्राच्या संघर्षास सलाम...!

By Admin | Published: July 10, 2014 11:45 PM2014-07-10T23:45:24+5:302014-07-11T00:59:51+5:30

जालना : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ आशावादाच्या बळावरच एका शेतमजुराने डोंगराएवढ्या दु:खावर मात करीत स्वत:सह मुलाच्या संसाराची बाग फुलविण्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे.

Happiness of father-son struggle ...! | पिता-पुत्राच्या संघर्षास सलाम...!

पिता-पुत्राच्या संघर्षास सलाम...!

googlenewsNext

जालना : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ आशावादाच्या बळावरच एका शेतमजुराने डोंगराएवढ्या दु:खावर मात करीत स्वत:सह मुलाच्या संसाराची बाग फुलविण्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे.
जालना तालुक्यातील मानेगाव येथील गोविंद धारूरकर. एक गरीब शेतमजूर. ३ मुलांच्या जन्मानंतर ३० वर्षापूर्वी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेकरीता मानेगावहून जालन्यात दाखल झाले होते. पत्नीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर हे दाम्पत्य तीन मुलांसह मानेगावकडे परतू लागले होते. शासकीय गाडीने हे दाम्पत्य रामनगर फाट्यावर मुलाबाळासह उतरले. सोबत वृद्ध आई होती. मानेगावकडे जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाच्या प्रतीक्षेत हे कुटुंबिय रस्त्याच्या कडेला ताटकळत असताना एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तीन मुलांसह वृद्धेस जागीच चिरडून टाकले.
क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून परतू लागलेल्या गोविंदरावांना आपला वंशच गमावण्याची वेळ आली. डोंगराएवढे हे दु:ख पचवून अश्रू न ढाळता ते आपल्या पत्नीसह जालन्याला आले. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पुनर्जीवित करून घेतली.
शासकीय कार्यक्रमांतर्गत म्हणजे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या या शेतमजुराची तत्कालीन शल्यचिकित्सकांनी गांभिर्याने दखल घेतली. अपघातात मूलबाळं गमावलेल्या या शेतमजुरास शासकीय रुग्णालयात शिपाईपदाची नोकरी बहाल केली. गोविंदरावांना नौकरी करीत असताना पुत्ररत्न जन्माला आले. अन् या कुटुंबियावर आनंदाची लहर आली. अशिक्षित असलेल्या गोविंदराव यांनी या प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड जिद्दीने आणि दुर्गम इच्छाशक्तीच्या जोरावर प्रल्हाद यास बारावीपर्यत जालन्यातच शिकविले. त्यानेही इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेत ९५ टक्के गुण घेतले.
तेव्हा या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तेथून प्रल्हाद याने औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. एम.बी.बी.एस.च्या परीक्षेतही तो गुणवत्तेत आला. त्यानंतर पदव्युत्तर शल्यचिकित्सक झाल्यानंतर डॉ. प्रल्हाद यांची न्यूरो सर्जन या अभ्यासक्रमासाठी सहा शासकीय जागांतून निवड झाली.
मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टीस करणारे डॉ. प्रल्हाद हे जालना जिल्ह्यातून पहिले न्युरो सर्जन ठरले आहेत. जिल्हावासियांचा ही अभिमानाची ठरली आहे. त्याही पलिकेकडे एक गरीब शेतमजूर पुढे शिपाई म्हणून नौकरी करणारे गोविंदराव धारूरकर यांची दुर्गंम इच्छाशक्ती व प्रबळ आशावाद हेच जिल्हावासियांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. त्यामुळे शिवसेनेसह अन्य संघटनांनी त्याची दखल घेतली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Happiness of father-son struggle ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.