धन्य अजि दिन, जाहले गौतम बुद्धाचे अस्थी दर्शन; औरंगाबादकर अभूतपूर्व क्षणाने कृतार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:02 PM2023-01-28T12:02:32+5:302023-01-28T12:05:56+5:30
संपूर्ण रस्त्यावर फुले, रांगोळी : ‘परभणी ते चैत्यभूमी’ हा प्रवास १७ जानेवारीपासून सुरू झाला असून मुंबईत चैत्यभूमी येथे १५ फेब्रुवारी समारोप होईल.
औरंगाबाद : अडीच हजार वर्षांनंतर थायलंड येथून भारतात आलेल्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन औरंगाबादकर कृतकृत्य झाले. थायलंड येथील ११० बौद्ध भिक्खू, भारतीय भिक्खू आणि हजारो उपासकांसह हा अस्थीकलश घेऊन परभणी येथून निघालेली ही धम्मपदयात्रा गुरुवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी केम्ब्रिज चौक ते तीसगावदरम्यान, संपूर्ण रस्त्यावर फुलांचा वर्षाव व रांगोळी काढून शहरवासीयांनी ठिकठिकाणी या पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
केम्ब्रिज चौक येथे मुक्कामी असलेली ही धम्मपदयात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता बुद्धांचा अस्थिकलश घेऊन निघाली. पदयात्रेच्या समोर फुलांनी सजविलेला तथागतांचा अस्थिकलश रथ, तर मागे भिक्खू संघ आणि हजारो उपासक ‘बुद्धं सरणं गच्छामी, धम्मं सरणं गच्छामी, संघं सरणं गच्छामी’चा घोष करत चालत होते. चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, संजयनगर, मुकुंदवाडी, सिडको बसस्थानक चौक, सेव्हन हिल उड्डानपूल, आकाशवाणी चौक, मोंढा नाका उड्डानपूल, अमरप्रीत चौक, क्रांतीचौक, जुने हायकोर्ट, नवीन जिल्हा कोर्ट, एलआयसी कार्यालय, बाबा पंप, छावणी, नगर नाकापर्यंत असे ठिकठिकाणी शुभ्रवस्त्र परिधान केलेले उपासक- उपासिकांचे जथे सकाळपासूनच अस्थिकलश आणि पदयात्रेची प्रतीक्षा करीत होते.
पदयात्रेत थायलंड येथील जागतिक धम्मगुरू लाँगफुजी, भन्ते सोंगसेन फॅटफियन, भन्ते विचीयन अबोत, डॉ. एम. सत्यपाल, सिनेअभिनेते गगन मलिक व आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह समता सैनिक दलाचे स्त्री-पुरुष जवान तसेच राजू शिंदे, गौतम लांडगे, डॉ. कल्याण काळे, शेख युसूफ, अशोक डोळस, बंडू कांबळे, राजू साबळे, विजय मगरे, कृष्णा भंडारे, जालिंदर शेंडगे, जयप्रकाश नारनवरे, गौतम खरात, डॉ. अरुण शिरसाट, पवन डोंगरे, दामूअण्णा कांबळे आदींसह विविध पक्ष- संघटनांचे पदाधिकारी व हजारो उपासक- उपासिका सहभागी झाल्या होत्या. तथागतांच्या अस्थींचे दर्शन व पदयात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर जनसागर लोटला होता.
सुरुवातीला चिकलठाणा येथे माजी नगरसेवक रवी कावडे व बुद्धविहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पुढे भिक्खू आणि उपासकांचा ताफा धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनी येथे पोहोचताच माजी नगरसेवक राजू शिंदे, कीर्ती शिंदे, चंदा भालेराव, युवराज भालेराव, गोरख देहाडे, भारत शिंदे, चक्रधर मगरे, शशिकला मगरे, निवृत्ती घोरपडे, पंचशीला घोरपडे, उत्तम दणके, अनुसया दणके, शिवाजी नरवडे, दीपाली मिसाळ व नागरिकांनी या पदयात्रेेचे स्वागत केले. तेथे भिक्खू संघाने धम्मदेसना दिली. त्यानंतर संजयनगर, मुकुंदवाडी व परिसरात माजी आ. सुभाष झांबड, भाऊसाहेब नवगिरे, महेंद्र म्हस्के, राहुल सावंत, बकूल भुईगड, अंकुश मगरे, श्रीकांत रणभरे, आनंद डोळस, राजू मगरे, आसाराम गायकवाड, सोपानराव मगरे, सतीश गायकवाड, श्याम जगधने, भगवान गायकवाड यांच्यासह स्थानिक उपासक- उपासिकांनी पदयात्रेचे स्वागत केले. पुढे सिडको बसस्थानक चौकात महेंद्र सोनवणे, भारती सोनवणे, विजय भिवसने, उत्तम बनकर, राहुल साबळे, श्रावण गायकवाड व नागरिकांनी स्वागत केेले. रामगिरी हाॅटेलसमोर एन- ३ परिसर येथे राजेश लाडे व आजूबाजूच्या उपासकांनी स्वागत केले.
आकाशवाणी चौकात एस.एस. जमधडे, प्रवीण कदम, राजेश दाभाडे, निखिल खंदारे, सुनील सोनवणे, किशोर शेजूळ, राजेश साळवे, शारदा तुपे, बेबी लोहे, रुक्मिणी साबळे, साधना गायकवाड, आशा शेजूळ व उपासकांनी पुष्पवृष्टी करत भिक्खू संघाचे स्वागत केले. पुढे रमानगर, क्रांतीचौक, न्यायालय परिसर, एलआयसी, बाबा पंपाजवळही पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. येथे मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, यशवंत कांबळे व भीमनगर, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी परिसरातील हजारो उपासक उपस्थित होते.
रमानगर परिसरात धम्मदेसना
रमानगर परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तेथे दुपारी ३.२० वाजता अस्थिकलश घेऊन धम्मरथ व धम्मपदयात्रेतील भिक्खू संघ पोहोचला. तेव्हा रस्त्यावर आंथरलेली फुले व रांगोळीवरून थायलंडचे ११० भिक्खू, स्थानिक भिक्खू आले. तिथे उपासक- उपासिकांनी भिक्खूंचे भक्तिभावे दर्शन घेतले. अस्थिकलशावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मिलिंद बुद्ध विहार परिसरातील सभामंडपात उपस्थित भिक्खूंनी पंचशील, त्रिशरण व आशीर्वादपर गाथा पठण केली. यावेळी धम्मदेसनाही देण्यात आली. गगन मलिक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ. संजय शिरसाट यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले व भिक्खू संघाचे स्वागत केले.
धम्मयात्रेचे ‘लोकमत भवन’ समोर स्वागत
‘लोकमत भवन’ समोर ही पदयात्रा आली. त्यावेळी एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी तथागत गौतम बुद्धांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतले. जगाला प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले, अशी कृतार्थ भावना व्यक्त करून उपस्थित थायलंडचा भिक्खू संघ, सिनेअभिनेते गगन मलिक व सिद्धार्थ हत्तिअंबीर यांना शुभेच्छा दिल्या.
धम्मपदयात्रेमुळे एकेरी वाहतूक
जालना रोडवरून निघालेल्या या पदयात्रेचे स्वागत व तथागतांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून हा रस्ता गजबजला होता. त्यामुळे पोलिसांची धांदल उडाली. एका बाजूने वाहतूक सुरू केल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. मात्र, समता सैनिक दलाचे जवान व उपासकांनी वाहतूक सुरळीत करण्यास मोलाची कामगिरी बजावली.
धम्मचक्र गतिमान करण्यासाठी ही यात्रा
सिनेअभिनेते गगन मलिक म्हणाले की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले धम्मचक्र गतिमान करण्यासाठी थायलंडचा भिक्खू संघ तथागतांची अस्थी घेऊन महाराष्ट्रात दाखल झाला. ‘परभणी ते चैत्यभूमी’ हा प्रवास १७ जानेवारीपासून सुरू झाला असून मुंबईत चैत्यभूमी येथे १५ फेब्रुवारी समारोप होईल. या प्रवासात भिक्खूंच्या पायाला दुखापती झाल्या. पण कशाचीही तमा न करता भिक्खू संघ पदयात्रेत निरंतर चालत आहे. औरंगाबादेतील उपासक- उपासिकांचा उत्साह पाहून थायलंडचे जागतिक धम्मगुरू लाँगफुजी व सहकारी प्रभावित झाले आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वी थायलंडमध्ये नेेण्यात आलेली बुद्धांची अस्थी आता भारतात आली, ही आपणासाठी भाग्याची गोष्ट आहे.
गगन मलिक थायलंडला रवाना
रमानगर येथे भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचे प्रास्ताविक केल्यानंतर लगेच गगन मलिक थायलंडसाठी रवाना झाले. तेथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण असून तो सोहळा आटोपला की पुन्हा ते या धम्मपदयात्रेत सहभागी होण्यासाठी परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.