शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 02:56 PM2021-11-13T14:56:05+5:302021-11-13T14:57:22+5:30
लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ
औरंगाबाद : ‘टँकरवाडा’ ही ओळख मिटवत सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याच्या भूजल पातळीत २.७९ मीटरने वाढ झाली ( Groundwater level in Marathwada ) आहे. यंदा पावसाची मराठवाड्यावर कृपादृष्टी राहिली. यामुळे दुष्काळाची सावट मिटले आहे.
मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक भूजल पातळी ४.३७ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी १.१६ मीटरची वाढ हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. भूजल पातळी ३.९४ मीटरने वाढून परभणी दुसऱ्या स्थानावर आहे, तर २.११ मीटरने भूजल पातळी वाढून औरंगाबाद ६ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी पाणीपातळी २.०३ मीटर एवढी होती. मराठवाड्यात १११२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी या कालावधीत सरासरी ६७९.५ मिमी पाऊस होतो. परतीच्या पावसाने काही जिल्ह्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा मोठा फायदा होणार आहे. हवामान पोषक राहिले तर गहू, ज्वारी अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावांची संख्या तुरळक राहील.
सोनपेठ तालुक्यात विक्रमी वाढ
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील ८७५ निरीक्षण विहिरीच्या पाणीपातळीची तपासणी केली. ७६ तालुक्यांतील या निरीक्षण विहिरी आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे ०.२७ मीटरने भूजल पातळी वाढली. ही मराठवाड्यातील सर्वांत कमी वाढ आहे, तर सर्वाधिक परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील भूजल पातळीत ७.३५ मीटर एवढी विक्रमी वाढ झाली आहे. भूजल पातळीची दुसरी पाहणी फेब्रुवारीत होणार आहे. त्यावेळी उन्हाळ्यातील परिस्थितीचा अंदाज येईल.
बी. एस. मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
जिल्हा भूजल पातळी वाढ (प्रति मीटर)
औरंगाबाद २.११
जालना २.५०
परभणी ३.९४
हिंगोली १.१६
नांदेड १.२१
लातूर ४.३७
उस्मानाबाद ३.८५
बीड ३.१६