राजेंद्र दर्डा यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:50 AM2017-11-23T00:50:59+5:302017-11-23T00:51:06+5:30
‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, चाहते व वाचकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’च्या प्रांगणात मंगळवारी यानिमित्त जनसागर लोटलेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, चाहते व वाचकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’च्या प्रांगणात मंगळवारी यानिमित्त जनसागर लोटलेला होता.
राजकीय, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, बांधकाम व्यापार या क्षेत्रांतील मंडळींनी राजेंद्र दर्डा यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच जुन्या जाणत्यांबरोबरच तरुण आणि महिलांच्या उपस्थितीने एक रंगबिरंगी आनंदनगरीच निर्माण झालेली बघावयास मिळाली. राजेंद्र दर्डा यांच्याप्रती असलेली सद्भावना, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या कामांची आठवण ही पदोपदी ताजी होत होती.
सकाळपासूनच जालना रोडवरील ‘लोकमत’चे प्रांगण माणसांनी आणि शुभेच्छांसाठी आणलेल्या फुलांनी बहरून गेले होते. राजेंद्र दर्डा यांनी सुहास्य वदनाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. अनेकांंनी शुभेच्छा देताना उत्स्फूर्तपणे शेरोशायरी पेश केली. काहींनी कवितेच्या ओळी सादर केल्या, तर काही जणांचा याचदिवशी वाढदिवस असल्याचे लक्षात येताच त्यांचाही राजेंद्र दर्डा यांनी शुभेच्छा देऊन सन्मान केला.
पक्ष, जात-धर्मविरहित जनसमुदायाचा हा जणू स्नेहमेळावाच ठरला. यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी झाल्या. हास्यविनोदात त्यांचा संवाद रंगला. स्वत: राजेंद्र दर्डा हे सर्वांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधत होते. यानिमित्ताने एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. सायंकाळी ७ वाजेनंतरही उशिरापर्यंत शुभेच्छांचा वर्षाव चालूच राहिला. मनामनात शुभेच्छा घेऊन लोंढेच्या लोंढे ‘लोकमत’च्या दिशेने धावत होते.
एका विवाह समारंभाच्या निमित्ताने शहरात अनेक राजकीय दिग्गज दाखल झाले होते. त्यांनी वाढदिवसानिमित्त राजेंद्र दर्डा यांना आठवणीने शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांचा मोबाइल खणखणत राहिला. सोशल मीडियावरही शुभेच्छांची धूम राहिली. व्हॉटस् अॅप, फेसबुकवर क्षणात
राजेंद्र दर्डा यांना शुभेच्छा दिलेली छायाचित्रे झळकत होती. त्याचाही एक आगळा आनंद सोशल
मीडियावर सक्रिय असलेल्यांनी लुटला.
हडकोमध्ये रक्तदान शिबीर
राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त टी.व्ही. सेंटर परिसरातील पोलीस-सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात स्वत: राजेंद्र दडां, संयोजक प्रा. राजेश भोसले पाटील आदी.
लाडूतुला
राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी दुपारी गोमटेश मार्केटमध्ये राजेंद्र दर्डा यांची लाडूतुला करण्यात आली. वेलकम ट्रॅव्हल्सचे सुभाष बाहेती आणि परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजेंद्र दर्डा यांचे श्रीमती रंभाबाई बाहेती यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले. त्यानंतर लाडूतुला करण्यात आली. यावेळी गुलमंडी, गोमटेश मार्केट, टिळक रोड परिसरातील व्यापारी व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबेडकरनगरात रंगला सांस्कृतिक कार्यक्रम
‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. आंबेडकरनगरात हजारो रसिकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. यात सिद्धार्थ दामोदर यांच्या नृत्याने डोळ्यांचे पारणे फेडले, तर हास्य कलावंत प्रकाश भागवत यांनी उपस्थितांना विविध किस्से सांगून हसविले.
या कार्यक्रमाला जोडूनच दिवसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरात डॉ. नागदेव व त्यांच्या सहकाºयांनी २५० रुग्णांची तपासणी केली. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. याच ठिकाणी महिलांची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चक्रधर मगरे व शशिकला मगरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.