‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 08:02 PM2024-07-30T20:02:24+5:302024-07-30T20:03:14+5:30

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

'Har Ghar Jal' villages declared, horses stuck due to water grid works, taps dry! | ‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच!

‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच!

छत्रपती संभाजीनगर : जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झालेल्या १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तरीही अनेक गावांत नळाला पाणीच येत नाही, तर काही गावांना प्रति माणसी ५५ लिटर ऐवजी कधी कधी १०-२० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी योजनांची कामे जि.प. पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत. सुरुवातीला मार्च अखेरपर्यंत हे ‘मिशन’ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातच मुदतीच्या आत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. अखेर शासनाने या ‘मिशन’ अंतर्गत रखडलेल्या कामांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदवाढ दिली. त्यानुसार योजनांच्या कामाने गती घेतली आहे.

सध्या ५७५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची ५५६ कामे पूर्ण झाली असून ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली, तर १५७ गावे प्रमाणित करण्यात आली आहेत. यापैकी १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. असे असले तरी नळजोडणी दिलेल्या अनेक गावांतील नळांना घरापर्यंत पाणीच येत नाही. नियमानुसार प्रतिदिन प्रति माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे ‘जलजीवन मिशन’चे उद्दिष्ट आहे. मात्र, अनेक धरणांनी तळ गाठला आहे, तर वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड या चार तालुक्यांसाठी ‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या वॉटर ग्रीडचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक गावांमध्ये प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देणे शक्य झालेले नाही, हे वास्तवही समोर आले आहे.

ग्रामसभेने घ्यावा लागतो ठराव
जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे व गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी नळजोडणी दिल्यानंतर ‘हर घर जल’ प्रमाणित करण्यात येते. त्यानंतर त्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन आपले गाव ‘हर घर जल’ घोषित करावे लागते. त्यानंतर केंद्र सरकारच्या या जल जीवन मिशनच्या पोर्टलवर या गावांची नोंद केली जाते.

Web Title: 'Har Ghar Jal' villages declared, horses stuck due to water grid works, taps dry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.