बांधकाम करण्यावरून शेजाऱ्यांचा त्रास; कंटाळून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:36 PM2020-07-08T19:36:46+5:302020-07-08T19:38:46+5:30
एक वर्षापासून गायकवाड हे बांधकाम करीत होते. जवळच राहणारे काही जण बांधकामावरून सतत मानसिक त्रास देत होते.
औरंगाबाद : घराचे बांधकाम करण्यावरून शेजाऱ्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी म्हाडा कॉलनीत घडली. घटनास्थळी आढळलेल्या सुसाईड नोटच्या आधारे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
उषा विजय गायकवाड (५४, रा. म्हाडा कॉलनी, महावीर चौक परिसर), असे मृत महिलेचे नाव आहे. प्रदीप ऊर्फ बालाजी रोंगे, प्रदीप यांची पत्नी, गौरव रोंगे, भुजंग यांची पत्नी, सौरभ भोळे, लक्ष्मण पगारे, दयानंद आरक, दयानंद यांची पत्नी, मयूर आरक आणि शुभम आरक, अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.
एक वर्षापासून गायकवाड हे बांधकाम करीत होते. जवळच राहणारे काही जण बांधकामावरून सतत मानसिक त्रास देत होते. गायकवाड कुटुंबाने तेथे राहू नये म्हणून सतत भांडण करीत आणि जिवे मारण्याची धमकी देत. याप्रकरणी मृत उषा यांच्या पतीने मे २०१९ आणि फेब्रुवारी २०२० मध्ये क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतरही आरोपीकडून त्यांना त्रास देणे सुरूच होते. या त्रासाला कंटाळून उषा यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर बेशुद्धावस्थेत त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांना त्यांच्या अंगावरील कपड्यात एक चिठ्ठी सापडली. शिवाय घरातील डायरीतही त्यांनी शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले. क्रांतीचौक पोलिसांनी मृताच्या खोलीतून डायरी आणि चिठ्ठी जप्त केली आहे. तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत.