प्रेमास नकार दिल्याने मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना सक्त मजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 05:42 PM2021-03-10T17:42:05+5:302021-03-10T17:43:15+5:30
Kidnapping of minor girl जालन्याकडे जाताना एका दुचाकीवर चौघे असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले व त्यांची गाडी थांबवली.
औरंगाबाद : प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. भिष्मा यांनी प्रत्येकी ३ वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.
सागर रामसिंग परदेशी (१९) आणि गणेश जनार्दन राठोड (१७, दोघे रा. बालानगर, पाचोड रोड अंबड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत १६ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, ५ मे २०११ रोजी फिर्यादी घराकडे परतत असताना मनोजसह (विधी संघर्ष बालक नाव बदललेले) दोघे आरोपी एका दुचाकीवर तेथे आले. प्रेम करण्यास नकार देते का, म्हणत आरोपी सागरने तिला बळजबरी दुचाकीवर तिघांच्या मध्ये बसविले. त्यानंतर आरोपी फिर्यादीला घेऊन प्रथम कचनेरला गेले व तेथून जालन्याकडे निघाले. जालन्याकडे जाताना एका दुचाकीवर चौघे असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले व त्यांची गाडी थांबवली. पोलिसांनी चौकशी करताच फिर्यादीने घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना जालना पोलीस ठाण्यात आणले व घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन उपनिरीक्षक बी.यू. बोडखे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने वरील दोघा आरोपींना दोषी ठरवून भादंवि कलम ३६३ अन्वये ,प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५ हजार दंड ठोठावला. प्रकरणात अॅड. मुंदवाडकर यांना अॅड. राधेशाम नरोटे यांनी सहाय्य केले.