'मेहनत खुप, कमाई कमी'; शेतकरी कोणाला व्हायचे विचारल्यास विद्यार्थ्यांचा स्पष्ट नकार
By योगेश पायघन | Published: November 24, 2022 08:02 PM2022-11-24T20:02:06+5:302022-11-24T20:03:00+5:30
शिक्षण सचिव देओल शहरात आल्यावर त्यांनी खाेडेगाव येथील जिल्हा परिषद व खाजगी शाळेला भेट दिली.
औरंगाबाद: ‘विद्यार्थ्यांनो आयुष्यात काय बनायचे’ असा प्रश्न राज्याचे शिक्षण सचिव देओल यांनी विचारला. तर विद्यार्थ्यांनी डाॅक्टर, इंजिनीअर अशी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यानंतर ‘शेतकरी किती जणांना व्हावे वाटते’असे विचारल्यावर एकही विद्यार्थ्यांने हात वर केला नाही. का शेतकरी व्हावे वाटत नाही असे विचारल्यावर, मेहनत खुप कमाई कमी अशी उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली. त्यावर अभ्यास करा मेहनत करा तरच यशस्वी व्हाल असा, सल्लाही सचिव देओल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षण सचिव देओल शहरात आल्यावर त्यांनी खाेडेगाव येथील जिल्हा परिषद व खाजगी शाळेला भेट दिली. पहिलीच्या विद्यार्थ्यांना चित्र वाचन, तिसरीच्या विद्यार्थ्यांना चढता उतरता क्रम तर सातविच्या विद्यार्थ्यांकडून जापनीज संवाद म्हणून घेत संवाद साधला. त्यानंतर गारखेडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सचिव देओल यांची मुलाखत घेत आवडी निवडी जाणून घेत प्रश्न प्रतिप्रश्न करत हा संवाद रंगला होता. नारेगाव मनपा शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळांच्या तसेच फिल्डवरील प्रत्यक्ष अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. विभागांतील व योजनांतील समन्वयावरही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शिक्षण उपसंचालक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील २३.३९ लाख (९१.७१ टक्के) टक्के विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे. तर २ लाख १५ हजार ४०७ विद्यार्थ्यांकडे अद्याप आधार नाही. तसेच ५ लाख ९९ हजार २४३ विद्यार्थ्यांचे आधार जुळत नसल्याचे माहीती गुरूवारी समोर आली. कोणत्याही परिस्थितीत अडचणींवर मात करून १०० टक्के आधार अपडेशन ३१ डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांनी दिल्या. आदर्श शाळा, निजामकालीन शाळांचा आढावा घेत रिक्त पदे, पदांचे कार्य वाढवण्यासंबंधीही त्यांनी अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, जयश्री चव्हाण, सहायक संचालक एस. काळुसे, डॉ. सतीश सातव, रमेश ठाकुर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थी आधार अपडेटची गती वाढवा
सरल पोर्टलवर प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार अपडेट झाला पाहीजे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना या सरल पोर्टलसोबत लिंक असतील. त्यामुळे ३१ डिसेंबर पूर्व सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करा. कुणीही विद्यार्थी आधार अपडेट न झाल्याने कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये साठी खबरदारी घ्या, गती वाढवा अशी सुचना राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांनी दिल्या.
अशी आहे आधारची स्थिती
जिल्हा -आधार असलेले विद्यार्थी -आधार नसलेले विद्यार्थी -इनव्हॅलिड आधार
औरंगाबाद - ८,२६,३९३ -८८,४३५ -१,८५,९५४
जालना -३,९६,७०२ -३०,५०९ -८२,४४०
बीड -५,४१,३५९-३७,६३८ -१,३७,४२८
हिंगोली -२,११,५५९ -१८,०८८ -७६,०१४
परभणी -३,६३,३६४ -४०,७३७ -१,१७,४०७