मेहनतीने ' श्रीं ' च्या मुर्त्याबनवून कमावलेले दोन लाख रुपये चोरट्यानी लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 06:15 PM2017-08-27T18:15:00+5:302017-08-27T18:18:12+5:30
रात्रंदिवस मेहनत करून बनविलेल्या गणेश मूर्ती विक्रीतून मिळालेले मूर्तीकारांचे दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शनिवारी पहाटे चार ते सहा दरम्यान औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील शेडमध्ये घडली.
औरंगाबाद, दि. 27 : रात्रंदिवस मेहनत करून बनविलेल्या गणेश मूर्ती विक्रीतून मिळालेले मूर्तीकारांचे दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शनिवारी पहाटे चार ते सहा दरम्यान औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील शेडमध्ये घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, अहमदाबाद(गुजरात) येथील रहिवासी चमनभाई लालाभाई राठोड हे मूर्तीकार कुटुंब दरवर्षी गणेशोत्सवात मूर्ती तयार करून विक्री करण्यासाठी औरंगाबादेत येते. यावर्षीही दोन महिने आधी ते शहरात आले होते. औरंगपुरा येथील जि.प. मैदानावर बांबूच्या शेड तयार करून ते राहत आणि तेथेच त्यांनी गणेश मूर्ती तयार केल्या होत्या. या मूर्तींची विक्री त्यांनी आणि त्यांच्या कुटुबातील सदस्यांनी शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री ११पर्यंत केली. यानंतर सर्वांनी जेवण केल्यानंतर प्रत्येकांकडील पैसे एकत्र करून त्याची मोजणी केली. रात्री ३ वाजेपर्यंत मोजणीअंती मूर्ती विक्रीतून २ लाख १० हजार रुपये त्यांना मिळाले होते. ही रक्कम त्यांनी पत्नी पूनमबेन राठोड हिच्याकडे दिले आणि तिच्या उशीच्या खोळमध्ये ठेवले. सुमारे ४ वाजेच्या सुमारास राठोड पती-पत्नी झोपली.
सकाळी ६ वाजेच्या सुमारास पुनमबेन झोपेतून उठली तेव्हा त्यांना उशाखाली ठेवलेली पैशाची खोळ (पिशवी)कापून कोणीतरी त्यातील दोन लाख रुपये लांबविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.या खोळमध्ये केवळ दहा हजार रुपये शिल्लक ठेवून चोरटा पसार झाला होता. रात्रंदिवस मेहनत करून जमविलेले रोख दोन दोन लाख रुपये चोरट्यांनी पळविल्याचे त्यांनी पतीला सांगितले. या घटनेने राठोड कुटुंब पूर्ण हादरून गेले. त्यांनी या घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अनोळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक अनिल आढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बनकर हे तपास करीत आहे.
उधारी कशी फेडावी
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल राठोड दाम्पत्य व्यापा-यांकडून उधारीवर खरेदी करतात आणि गणशोत्सवानंतर त्यांना पैसे देतात. आता चोरट्यांनी संपूर्ण रक्कमच पळविल्याने व्यापा-यांची उधारी कशी फेडावी,असा प्रश्न आता त्यांच्यासमोर पडला आहे.
पाळत ठेऊन केली चोरी
राठोड दाम्पत्य हे रात्री ३ पर्यंत जागे होते.पहाटे ४ ते ६ दरम्या मूर्तीकार राठोड दाम्पत्य झोपले. पहाटेच्या साखर झोपेत चोरट्यांनी पाळत ठेवून डाव साधला.