नानांची दूध संघाच्या अध्यक्षपदाची वाट सरळ की बिकट ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 14:22 IST2022-01-22T14:15:48+5:302022-01-22T14:22:11+5:30
Haribhau Bagade : २३ जानेवारीला १४ पैकी ७ बिनविरोध निवडून आलेले सोडून उर्वरित ७ जण कोण निवडून आले, हे स्पष्ट होईल.

नानांची दूध संघाच्या अध्यक्षपदाची वाट सरळ की बिकट ?
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाची शनिवारी, २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत निवडणूक होत आहे. २३ जानेवारीला १४ पैकी ७ बिनविरोध निवडून आलेले सोडून उर्वरित ७ जण कोण निवडून आले, हे स्पष्ट होईल. त्यानंतर खरे राजकारण सुरू होईल ते अध्यक्षपदाचे. मागच्या वेळी संपूर्ण संचालक मंडळच बिनविरोध निवडून आले होते. विधानसभेचे सभापती या नात्यानेही हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade ) यांचे ऐकले गेले होते.
आता बिनविरोध निवडून आलेल्या ७ संचालकांमध्ये शिवसेना वरचढ आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन मंत्री आहेत. त्यापैकी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची वेळेवर नेमकी खेळी काय राहील, हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांना दगाफटका बसला आणि त्यावेळी त्यांची परिस्थिती गड आला पण सिंह गेला, अशी झाली होती. यावेळी असा दगाफटका होणार नाही, यासाठी ते ताकही फुंकून पीत आहेत.
शिवसेनेचे संख्याबळ वाढल्यास मंत्री संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार अध्यक्षपदावर शिवसेनेचाच दावा ठोकणार, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. नानांविरुध्द आतून त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश पठाडे यांच्यासाठी काही सुप्त शक्ती काम करीत होत्या का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.