हर्षकुमारने अटक अटळ दिसताच नातेवाइकांकडे लपवले सोन्याचे बिस्किट, मौल्यवान वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:50 IST2025-01-07T12:45:30+5:302025-01-07T12:50:01+5:30
कारवाईच्या धास्तीने एक नातेवाईक दहा तोळ्याच्या बिस्किटासह अधिकाऱ्यांसमोर हजर; आत्तापर्यंत २२.५९ पैकी १५ कोटींची संपत्ती निष्पन्न

हर्षकुमारने अटक अटळ दिसताच नातेवाइकांकडे लपवले सोन्याचे बिस्किट, मौल्यवान वस्तू
छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधीचा घोटाळा उघड झाल्यानंतर हर्षकुमार क्षीरसागरने शक्य तितके सोने, मौल्यवान वस्तू नातेवाइकांकडे लपविण्याचा प्रयत्न केला. हर्षकुमारचा हा बनाव लक्षात येताच एका नातेवाइकाने त्याच्याकडे दिलेले १० तोळ्यांचे २४ कॅरेट सोन्याचे बिस्कीट पोलिस अधिकाऱ्यांसमोर हजर होत सुपुर्द केले.
आपल्या कृत्याचा भंडाफोड होणार असे नोव्हेंबरअखेरीस हर्षकुमारला लक्षात आले होते. त्यानंतर आई-वडिलांचा तत्काळमध्ये पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न त्याने केला. हे करत असतानाच त्याने घोटाळ्याच्या रकमेमधून विकत घेतलेल्या मौल्यवान वस्तू व शक्य तितके सोन्याचे दागिने नातेवाइकांकडे ठेवण्यास दिले. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंत्राटी लिपिक असलेल्या अवघ्या २१ वर्षांच्या हर्षकुमारच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची देशभरात चर्चा झाली व त्यानंतर त्याच्या नातेवाईक, मित्रांना त्याच्या या कारनाम्याचा उलगडा झाला.
१० तोळ्यांचे बिस्कीट; आणखी असण्याची शक्यता
हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून सर्वाधिक पैसे सोन्यात गुंतवले आहेत. त्यापैकी काही दागिने आई, मैत्रिणीच्या नावे घेतले. बहुतांश सोने मुंबई, कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटमध्ये होते. परंतु, कॅनॉट प्लेसचा रूम पार्टनर ते घेऊन गेल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, हर्षकुमारने व्यवहार केलेल्या प्रत्येकाला अटक होत असल्याचे कळताच घाबरलेल्या एका नातेवाइकाने पोलिस अधिकाऱ्यांसमोर येत हर्षकुमारने त्याच्याकडे ठेवलेले १० तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट सुपुर्द केले.
आज पुन्हा पोलिस कोठडी वाढणार?
हर्षकुमारसह त्याचे आई-वडील, मामाची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. दुपारी चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात येईल. हर्षकुमारने प्राथमिक चौकशीत घोटाळ्याची कबुली दिली असली तरी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची व मालमत्तेची जप्ती बाकी आहे. त्यामुळे पोलिस त्याच्या आणखी पोलिस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.
पंधरा कोटींपर्यंत संपत्ती सापडली
२१.५९ कोटींपैकी जवळपास १५ कोटी रुपयांची मालमत्ता, सोन्याचे दागिने, कार, दुचाकी व अन्य मौल्यवान वस्तू शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यातील मोठी रक्कम त्याने परदेश वारीवर उडवली आहे. ट्रॅव्हल वेबसाइट व एजंटकडून पोलिस आता त्याची माहिती मागवत आहे. निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार अधिक तपास करत आहेत.