हर्षवर्धन जाधवांच्या ‘गुगली’वर कुणाची दांडी उडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:33 AM2017-10-30T00:33:38+5:302017-10-30T00:37:34+5:30
आमदार चषकच्या निमित्ताने क्रिकेट सामने चांगलेच ‘रंगू’ लागले आहेत. आ. हर्षवर्धन जाधव यांच्या गोलंदाजीवर खेळताना राजकीय फलंदाजांची मात्र त्रेधातिरपट उडताना दिसत आहे
सुरेश चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : येथे आमदार चषकच्या निमित्ताने क्रिकेट सामने चांगलेच ‘रंगू’ लागले आहेत. आ. हर्षवर्धन जाधव यांच्या गोलंदाजीवर खेळताना राजकीय फलंदाजांची मात्र त्रेधातिरपट उडताना दिसत आहे. त्यांनी टाकलेल्या गुगलीवर कुणाची दांडी उडणार, याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीपाठोपाठ नगर परिषद निवडणूक आ. जाधव यांनी स्वतंत्रपणे आघाडीच्या चिन्हावर लढविली आणि येथून आ. जाधव व खा. चंद्रकांत खैरे यांच्यातील मतभेद वाढत गेले. याचा फटका शिवसेनेला चांगलाच बसला. त्यानंतर हाच फंडा जाधव यांनी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरला. मात्र यावेळी त्यांना शह देण्यासाठी खैरे यांनी केतन काजे यांना शिवसेनेत घेऊन त्यांच्या पत्नीला आमदार जाधवांच्या पत्नी संजना जाधव यांच्याविरुध्द पिशोर गटात मैदानात उतरविले आणि संपूर्ण ताकद लावून संजनातार्इंचा पराभव केला. यामुळे जाधव यांनी खैरे यांच्याविरूद्ध मोहीमच उघडली. कामे न करताच बिले उचलली असा आरोप खैरे यांच्यावर करून स्वत:च्या आमदार निधीतून कागदावर झालेले काम दाखवा असे खुले आव्हानही दिले. यानंतर जाधवांनी विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आणि लोकार्पण कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड यांना निमंत्रित केले. एकीकडे काँग्रेस पक्षाशी जवळीक साधताना शिवसेनेचे शिवबंधन कायम ठेवून ‘गुगली’ टाकल्याने दोन्हीकडील स्थानिक नेत्यांना हा चेंडू कसा खेळावा, याचा विचार करावा लागत आहे. तथापी या गुगली चेंडूवर कुणीतरी ‘आऊट’ होणार हे नक्की.