पिशोर सरपंच निवडीत हर्षवर्धन जाधव ठरणार किंगमेकर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:02 AM2021-02-08T04:02:26+5:302021-02-08T04:02:26+5:30

पिशोर : येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कुठल्याही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने चार जागा जिंकलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे ...

Harshvardhan Jadhav to be Kingmaker in Peshawar Sarpanch election ..! | पिशोर सरपंच निवडीत हर्षवर्धन जाधव ठरणार किंगमेकर..!

पिशोर सरपंच निवडीत हर्षवर्धन जाधव ठरणार किंगमेकर..!

googlenewsNext

पिशोर : येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कुठल्याही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने चार जागा जिंकलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे किंगमेकर ठरणार आहेत. यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वच पॅनलप्रमुख जाधवांच्या भेटीला गेल्याने सरपंच कोण बनणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिशोर ग्रामपंचायतमध्ये चार पॅनलमध्ये अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचे समर्थक पॅनल, तर हर्षवर्धन जाधव यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पॅनलची धुरा सांभाळणारे त्यांचे पुत्र आदित्यवर्धन जाधव यांच्यामुळे पिशोरच्या निवडणुकीत चांगलेच रंग भरल्या गेले. माजी सरपंच पुंडलिक डहाके यांच्या शिवशाही पॅनलला सर्वाधिक सात जागा, हर्षवर्धन जाधव समर्थक कै. रायभानजी जाधव पॅनलला चार जागा, संजनाताई जाधव यांच्या समर्थक पॅनलला दोन जागा तर राजेंद्र मोकासे व माजी उपसरपंच नारायण जाधव यांच्या आदर्श पॅनलला ३ व एक अपक्ष असे बलाबल राहिले आहे.

यामुळे कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने डहाके यांच्या पॅनलचे काही सदस्य व हर्षवर्धन जाधव गटाचे ४ सदस्य सहलीवर गेलेले होते. यामुळे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेले सरपंचपद या गटाकडे राहणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे, मात्र हर्षवर्धन जाधव यांच्या स्वागताला सर्वच पॅनलचे प्रमुख व उमेदवार उपस्थित असल्याने व त्याचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आलेले आहे. आता हर्षवर्धन जाधव हे नेमकी काय गुगली टाकणार, सत्तेचे समीकरण जुळणार की बिघडणार ही चर्चा नागरिकांत सुरू आहे. सध्याच्या समीकरणानुसार डहाके यांचे शिवशाही पॅनल व हर्षवर्धन जाधव यांचे समर्थक पॅनल यांची युती झाल्यास त्यांच्याकडे ११ सदस्य होतात व बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. यामुळे डहाके यांच्या सूनबाई सरलाबाई डहाके यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, दुसऱ्या पॅनलप्रमुखांनीही हर्षवर्धन जाधव यांची भेट घेतल्याने ते ग्रामपंचायतच्या सत्तेतील किंगमेकर असणार असल्याचे सध्यातरी बोलले जात आहे. यामुळे सोमवारी होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव कोणाच्या डोक्यावर हात ठेवतात, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

संजना जाधव समर्थक एकाने हर्षवर्धन यांची भेट घेतल्याची चर्चा

पिशोर ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आदर्श पॅनलचे प्रमुख व संजना जाधव समर्थक एक उमेदवार यांनीही जाधव यांची भेट घेतली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. असे झाल्यास एक अपक्ष मिळून ९ सदस्यांची जुळवाजुळव होते. यामुळे या गटातून आदर्श पॅनलच्या वतीने कुसुमबाई धोंडू नवले, संजना जाधव समर्थक पॅनलच्या ज्योती गणेश मोकासे तसेच अपक्ष उमेदवार सविता अण्णा नवले यांची नावे चर्चेत आहेत.

छायाचित्र : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भेट घेण्यासाठी उपस्थित असलेले पिशोर ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख व समर्थक.

Web Title: Harshvardhan Jadhav to be Kingmaker in Peshawar Sarpanch election ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.