हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी; दोन समर्थकांकडून जीवन संपविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:47 IST2024-11-24T15:43:47+5:302024-11-24T15:47:02+5:30
कन्नड येथील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव होत असल्याचे दिसल्यानंतर त्यांच्या दोन समर्थकांनी नैराश्यातून विषारी द्रव प्राशन केले.

हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी; दोन समर्थकांकडून जीवन संपविण्याचा प्रयत्न
कन्नड :कन्नड-सोयगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या दोन समर्थकांनी विषारी द्रव प्राशन केले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुनील रामदास शिरसाठ (वय ४२) व (वय ३०, दोघेही रा. जामडी घाट) अशी त्यांची नावे आहेत.
शनिवारी मतमोजणी सुरू असताना चौदाव्या फेरीपर्यंत महायुतीच्या उमेदवार संजना जाधव या आघाडीवर होत्या. यामुळे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव होत असल्याचे दिसल्यानंतर त्यांचे समर्थक असलेले सुनील शिरसाठ यांनी दुपारी नैराश्यातून विषारी द्रव प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी आलेला त्यांचा मित्र आनंद जाधव यांनीही रुग्णालयातून बाहेर जात विषारी द्रव प्राशन केले. हे दोघेही हर्षवर्धन जाधव यांचे कट्टर समर्थक समजले जातात. आनंद जाधव यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच हर्षवर्धन जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. तसेच समर्थकांनी अशी पावले उचलू नये, असे त्यांनी आवाहन केले.