छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावाची पाणीपातळी १८ फूट! मनपाने पाण्याचा उपसाही वाढविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 20:30 IST2024-08-26T20:30:00+5:302024-08-26T20:30:48+5:30
जायकवाडी धरणात मुबलक प्रमाणात पाणी असतानाही महापालिकेकडे शहरात जास्त पाणी आणण्यासाठी यंत्रणा नाही. १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावरच भागत होती.

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावाची पाणीपातळी १८ फूट! मनपाने पाण्याचा उपसाही वाढविला
छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील सुमारे १४ वॉर्डांची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावर भागते. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भिजपावसामुळे तलावाची पाणीपातळी रविवारी सकाळी १६.५ फुटांपर्यंत पोहोचली. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे तलावात पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू असून, सोमवारी सकाळी पाणीपातळी १८ फुटांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मनपा अधिकाऱ्यांनी वर्तविला. तलावातून पाण्याचा उपसा वाढविण्यात आला. दररोज ७ एमएलडी पाणी घेण्यात येत आहे.
जायकवाडी धरणात मुबलक प्रमाणात पाणी असतानाही महापालिकेकडे शहरात जास्त पाणी आणण्यासाठी यंत्रणा नाही. १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावरच भागत होती. लोकसंख्या वाढू लागल्याने महापालिकेने १९७४ मध्ये ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकून जायकवाडीहून शहरात पाणी आणले. हर्सूल तलाव दरवर्षी भरतोच असे नाही. मागील वर्षीही परतीच्या पावसाने तलावात जेमतेम पाणी आले होते. आताही तलावात दोन दिवसांपासून पाण्याची आवक चांगली वाढली आहे. २४ तासांत अडीच ते तीन फुटांनी पाणीपातळी वाढत आहे. शनिवारी तलावाची पाणीपातळी साडेबारा फूट होती. सोमवारी सकाळी पाणीपातळी १६.५ फूट झाली. सोमवारी सकाळी १८ फुटांपर्यंत पाणी येईल, असे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले.
७ एमएलडी पाण्याचा उपसा
महापालिकेने मागील वर्षीच हर्सूल येथे ४ कोटी रुपये खर्च करून नवीन १० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले. तलावातील पाणीपातळी वाढू लागताच पाणीपुरवठा विभागाने उपसाक्षमताही वाढविली. दररोज ७ एमएलडी पाणी शुद्ध करून १४ वॉर्डांना दिले जात आहे. पुढील काही दिवसांत जुन्या शहराला एक दिवस अगोदर पाणी देण्यात येईल.
हर्सूल तलावाचा इतिहास
१९५२ - तलावाचे बांधकाम पूर्ण
१९८२- महापालिकेकडे हस्तांतरण
१९३२- मीटर धरणाची लांबी
१७.७० - मीटर महत्तम उंची
१३७.५०- हेक्टर बुडीत क्षेत्र
२१५- मीटर लांब सांडवा
६.७९- दलघमी साठवण क्षमता