हर्सूल प्रक्रिया केंद्राला आता कचऱ्याची प्रतीक्षा; दररोज १५० मेट्रिक टन क्षमता
By मुजीब देवणीकर | Published: July 15, 2023 07:43 PM2023-07-15T19:43:16+5:302023-07-15T19:43:24+5:30
आता फक्त प्रशासनाच्या हिरव्या झेंड्याची या केंद्राला प्रतीक्षा आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरात दररोज ४८० मे. टन कचरा जमा होतो. पडेगाव, चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्राची क्षमता प्रत्येकी दीडशे मे. टन आहे. त्यामुळे दररोज १५० ते १८० मे. टन कचरा प्रक्रियेविना पडून असतो. अथक परिश्रमांनंतर हर्सूल येथील तिसरे प्रक्रिया केंद्र अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह पूर्णपणे उभे झाले आहे. १५० मेट्रिक टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची क्षमता या केंद्रातही आहे. आता फक्त प्रशासनाच्या हिरव्या झेंड्याची या केंद्राला प्रतीक्षा आहे.
राज्य शासनाने २०१८ मध्ये महापालिकेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १४८ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील जवळपास सव्वाशे कोटींचा निधीही प्राप्त झाला. या निधीतून सर्वप्रथम चिकलठाणा व त्यापाठोपाठ पडेगाव येथे दुसरा प्रकल्प उभारण्यात आला. या दोन्ही केंद्रात दररोज ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया न होणारा कचरा या दोन्ही केंद्रांवर पडून आहे. हर्सूल येथील तिसरा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी मनपाचे जोरदार प्रयत्न सुरू होते. प्रारंभी नागरिकांचा विरोध मावळल्यानंतर प्रकल्प उभारणीसाठी जागा कमी असल्याचे लक्षात आले. दोन शेतकऱ्यांची जागा भूसंपादन करावी लागली. शेडची उभारणी, अत्याधुनिक मशनरी बसवणे या प्रक्रियेत जवळपास एक वर्षाहून अधिक कालावधी गेला. विद्युत पुरवठ्याचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. प्रकल्प सुरू करण्यास आता कोणतीही अडचण नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले की, प्रकल्प पूर्णपणे उभा आहे. कचऱ्याचे वाहन मोजणाऱ्या वे ब्रिज उभारणीला आणखी पंधरा दिवस लागतील. किरकोळ कामे बाकी आहेत. लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे.