पाकिस्तान कारागृहातून आलेल्या हसीना बेगम यांंनी १४ दिवसात घेतला अखेरचा श्वास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:03 AM2021-02-10T04:03:26+5:302021-02-10T04:03:26+5:30

औरंगाबाद : नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम यांना पासपोर्ट हरवल्याने तब्बल १८ वर्षे कारागृहात डांबून ठेवण्यात आले ...

Hasina Begum from Pakistan Jail breathed her last in 14 days! | पाकिस्तान कारागृहातून आलेल्या हसीना बेगम यांंनी १४ दिवसात घेतला अखेरचा श्वास !

पाकिस्तान कारागृहातून आलेल्या हसीना बेगम यांंनी १४ दिवसात घेतला अखेरचा श्वास !

googlenewsNext

औरंगाबाद : नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम यांना पासपोर्ट हरवल्याने तब्बल १८ वर्षे कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते. २६ जानेवारी रोजी पाकिस्तान कारागृहातून सुटून मायभूमीत परतलेल्या हसीना बेगम यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. मायभूमीत उर्वरित आयुष्य जगण्याचे ''हसीन ख्वाब'' त्यांनी बघितले होते. आपले पुरातन घर काही मंडळींनी बळकावल्याचे शल्य त्यांना मागील १४ दिवसांपासून बोचत होते. त्यांनी अचानक घेतलेली एक्झिट अनेकांना धक्का देणारी ठरली.

औरंगाबाद शहरातील रशिदपुरा भागात राहणाऱ्या हसीना बेगम या १८ वर्षांपूर्वी नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांचा पासपोर्ट गहाळ झाला. त्यामुळे सरकारने त्यांना १८ वर्षे डांबून ठेवले होते. अनेक प्रयत्न केल्यानंतर ६५ वर्षीय हसीना बेगम २६ जानेवारी २०२१ रोजी मायभूमीत सुखरूप परतल्या होत्या. रशिदपुरा भागात त्या आपल्या बहिणीच्या मुलांसोबत आनंदाने राहत होत्या. डॉक्टरांकडून त्यांची सर्व तपासणी करण्यात आली होती. कोणताही आजार त्यांना नव्हता. लवकरच मोतिबिंदूचे ऑपरेशन करण्याचा त्यांचा मानस होता.

पण सोमवारी मध्यरात्री २ वाजता त्यांना अचानक घबराट होऊ लागली. पलंगावर त्या आराम करण्यासाठी पडल्या असता, त्यातच त्यांचे निधन झाले. नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तपासणी केली असता, त्या मृत झाल्याचे घोषित केले.

मायभूमीत परतल्यानंतर हसीना बेगम अत्यंत आनंदी होत्या. त्यांचे पुरातन घर एका नागरिकाने बळकावले, याचे शल्य त्यांना होते. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांकडेही एक निवेदन सादर केले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. पती दिलशाद अहेमद सहारनपूर येथे राहतात. ते हयात आहेत किंवा नाही याची माहिती नसल्याचे हसीना बेगम यांच्या बहिणीचा मुलगा खाजा जैनोद्दीन चिस्ती यांनी सांगितले.

रशिदपुरा येथील मोहम्मदी मशिदीमध्ये मंगळवारी दुपारी नमाज- ए -जनाजा, तर पिरगैबसाहब दर्गाह परिसरातील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

बाजरीची भाकरी, पुदिन्याची चटणी...

मृत्यूच्या रात्री हसीना बेगम यांनी बाजरीची भाकरी आणि पुदिन्याची चटणी खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. बहिणीच्या मुलाने त्यांना, सकाळी आपण चटणी आणि भाकरी तयार करू, असे आश्वासन दिले होते. पण मध्यरात्रीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

Web Title: Hasina Begum from Pakistan Jail breathed her last in 14 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.