‘आरटीओ’त जाण्याची कटकट थांबणार; घरातूनच लर्निंग लायसन्स काढता येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:32 PM2021-06-11T17:32:00+5:302021-06-11T17:33:24+5:30

लर्निंग, पर्मनंट लायसन असो की वाहनांसंबंधी अन्य कामे, ती करण्यासाठी वाहनचालकांना शासकीय शुल्कापेक्षाच्या दुप्पट रक्कम एजंटांना द्यावी लागते.

The hassle of going to ‘RTO’ will stop; Learning license can be obtained from home! | ‘आरटीओ’त जाण्याची कटकट थांबणार; घरातूनच लर्निंग लायसन्स काढता येणार !

‘आरटीओ’त जाण्याची कटकट थांबणार; घरातूनच लर्निंग लायसन्स काढता येणार !

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या वाहनाच्या नोंदणीसाठी निरीक्षकांकडून तपासणीही होणार बंद, वितरकांकडूनच होईल नोंदणी

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की, प्रत्येक जण वाहन चालविण्याचे लायसन काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जातो. वाहनचालकांना आधी लर्निंग लायसन काढावे लागते. त्यासाठी अर्ज करा, मग आरटीओ कार्यालयात जाऊन संगणकीय चाचणी द्यावी लागते. पण आता लर्निंग लायसनसाठी आरटीओ कार्यालयात जाऊन चाचणी देण्याच्या कटकटीपासून शिकाऊ वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. अगदी घरी बसून लर्निंग लायसन्स काढता येणार आहे.

आरटीओ कार्यालयात एजंटांशिवाय कामे होतच नाहीत, हा गेल्या अनेक वर्षांचा नागरिकांचा अनुभव आहे. लर्निंग, पर्मनंट लायसन असो की वाहनांसंबंधी अन्य कामे, ती करण्यासाठी वाहनचालकांना शासकीय शुल्कापेक्षाच्या दुप्पट रक्कम एजंटांना द्यावी लागते. परंतु गेेल्या काही वर्षांत संगणकीय प्रणालीमुळे वाहनचालकांना दिलासा मिळत आहे. आतापर्यंत स्पेशल परमिट काढणे, तात्पुरता वाहन परवाना घेणे, वाहनांचा कर भरणे ही कामे ऑनलाइन उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. याच आता पुढे लर्निंग लायसन आरटीओ कार्यालयात न जाताही मिळणार आहे. ३० जूनपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शिकाऊ वाहनचालकांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

ऑनलाइन अर्ज अन् चाचणी
सध्या लायसन्ससाठी ज्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागतो, अपाॅइंटमेंट घ्यावी लागते, त्या संकेतस्थळावर लर्निंग लायसनसाठी अर्ज करून चाचणी देता येईल. उमेदवारांना संकेतस्थळावर आधार क्रमांक नोंद करावा लागेल. नाव, पत्ता व स्वाक्षरी ही माहिती आधार डेटाबेसमधून परिवहन विभागाला मिळणार आहे. अर्जदाराला घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणी देता येईल. यामध्ये विचारलेल्या ६० टक्के अचूक उत्तर दिल्यास शिकाऊ लायसन्सची चाचणी उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरून शिकाऊ वाहन परवान्याची प्रिंट मिळणार आहे. याविषयी आरटीओ कार्यालयास पुढील आठवड्यात अधिक माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे.

...तर जावे लागेल आरटीओ कार्यालयात
ज्यांच्याकडे आधार नाही किंवा ऑनलाइन परीक्षा द्यायची नाही, अशांना आरटीओ कार्यालयात जाऊन परीक्षा देता येणार आहे. परंतु आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. लॅपटाॅप, संगणकही घराघरात आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स घरी बसून काढण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल, अशीच शक्यता वर्तविली जात आहे.

नव्या वाहनाची नोंदणी वितरकाकडूनच
नव्या वाहनाची विक्री केल्यानंतर त्या वाहनाची आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक शोरूममध्ये जाऊन तपासणी करतात. त्यानंतरच आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होते. परंतु आता वाहनाच्या नोंदणीसाठी वाहन निरीक्षक शोरूममध्ये जाऊन तपासणी करण्याची गरज राहणार नाही. ही पद्धतही ३० जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

बदल करणे सुरू
लर्निंग लायसन्सची चाचणी ऑनलाइन देऊन वाहनचालकांना स्वत: प्रिंट काढता येईल. तसेच नव्या वाहनाच्या नोंदणीसाठी शोरूममध्ये निरीक्षकांना जाण्याची गरज राहणार नाही. यासाठी काही बदल करणे सुरू आहे. अद्याप अधिक सविस्तर माहिती आलेली नाही. परंतु पुढील आठवड्यात अथवा ३० जूनपर्यंत हे सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आरटीओ कार्यालयाची अनेक कामे ऑनलाइन झालेली आहेत.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: The hassle of going to ‘RTO’ will stop; Learning license can be obtained from home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.