नाट्यगृहात ‘वेदनेचा हुंकार’
By Admin | Published: September 8, 2015 12:27 AM2015-09-08T00:27:12+5:302015-09-08T00:38:21+5:30
औरंगाबाद : वेदना म्हणजे काय असते... ही वेदना सार्वत्रिक झाल्यावर तिच्या पसरणाऱ्या गडद छायेतून कुणालाही पळता येत नाही...
औरंगाबाद : वेदना म्हणजे काय असते... ही वेदना सार्वत्रिक झाल्यावर तिच्या पसरणाऱ्या गडद छायेतून कुणालाही पळता येत नाही... पर्वताएवढ्या वेदनेचे हे हुंकार सिडको नाट्यगृहाने सोमवारी व्याकूळतेने पाहिले, सोसले. त्या तास दोन तासांची घडी सर्वांनाच असह्य झाली होती.
कार्यक्रम तसा मदतीचा हात देणारा. मग इतर दानशूरांच्या समारंभातून झळकणारे दातृत्व येथेही किंचित का होईना मिरविले जाईलच, अशी बहुतेकांची अपेक्षा येथे फोल ठरली. सभागृहात पाऊल ठेवताच, तेथील स्मशानशांतता अगोदरच अंगावर धावून येत होती. मग सभागृहात नजर फिरली की, पोटात कालवाकालव झाल्याशिवाय राहत नव्हती. मंचासमोरील सभागृहातील अर्ध्याअधिक खुर्च्यांवर त्या अभागी महिला सुतकी चेहऱ्यांनी बसून होत्या. त्यांचे उघडे-बोडखे कपाळ, त्यांच्यावरील आपबिती सांगत होते. हा मेळावा विधवांचा खचितच नव्हता; परंतु त्याला स्वरूप मात्र तसेच आले होते. सभागृहात नजर फिरवली की आसवे गाळणारे डोळे अन् कड्याखांद्यावर ओरडणारं लेकरू दिसत होतं. अगदी नवागत वधूंना अकाली आलेले वैधव्य आणि उतारवयातही तेच दु:ख सोसणाऱ्या ज्येष्ठ महिला. डोळ्यांच्या कडा पाणावलेले काही तुरळक बापे आणि तरुणही. बहुतांश महिलांचा पती गेलाय, तर काहींना वडील, भावाने आत्महत्या केल्याचे दु:ख आहे.
संपूर्ण कार्यक्रमावर दु:खाची छटा होती. मंच साधा होता. ना दीप प्रज्वलन. ना प्रतिमापूजन. फुले , हारतुरे टाळले होते. दु:खी जिवांना दिलासा देताना, कुठेही आत्मस्तुती होणार नाही, याचेही भान राखण्यात आले होते. मदतीचे धनादेशही संबंधितांना त्यांच्या जागेवरच पोहोचते केले जात होते. टाळ््या, शिट्या नको, हे आवाहन अगोदरच करण्यात आले होते.
नाना पाटेकर हे तसे समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व. त्यांनीही या दु:खी मनावर हळूच मायेची फुंकर मारली. ही मदत नाही. हा दिलासा आहे. तो देखील स्वत:ला. आम्ही हे केले नसते तर समोरचे दु:खी चेहरे पाहून आपण वेडेच झालो असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हसऱ्या चेहऱ्याच्या मकरंद अनासपुरेच्या चेहऱ्यावरील स्मितही लपले होते. आभाळ आटलयं. दु:ख मोठं आहे. आपण आपली माणुसकी शाबुत ठेवूया, असे म्हणत, त्याने ‘माणसाने माणसासाठी चालवलेली माणुसकीची ही चळवळ’ अशी त्याची चपखल व्याख्याही करून टाकली. सभागृहात एक तळमळ होती. विधायक जाणिवा उपस्थितांच्या हृदयाला हात घालत होत्या.
अप्रूपाबाई खैरनार या महिलेला प्रत्येकी १५ हजार रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले. याचे कारण जाणून घेतले, तेव्हा असे समजले की, अप्रूपाबाईच्या पती व मुलानेही कर्जापायी आत्महत्या केली. हे धनादेश स्वीकारण्यासाठी आलेल्या अप्रूपाबाईच्या देहबोलीने दु:खाची दाहकता अनेकांना जाणवली.
सध्या सप्टेंबरात पाण्याचे हे हाल आहेत. जानेवारीत काय होणार, असा प्रश्न यावेळेस पाटेकर, अनासपुरेद्वयींनी उपस्थित करून भविष्यातील आपले वर्तन सुधारण्याची विनंती केली. पैसे देणारे खूप आहेत. ते देतीलही; परंतु पाणी तर विकत घेता येणार नाही, मग काय करणार असा प्रश्न उपस्थित करून अनासपुरे म्हणाले, पाणी वापराचा ‘अवरनेस’शहरी मंडळींना आला पाहिजे. सर्वात जास्त पाण्याचा गैरवापर शहरात होतो. भविष्यात ही चैन परवडणारी नाही.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदतीचे वाटप होत असतानाच एक मध्यमवयीन व्यक्ती थेट धावत मंचावर पोहोचली. हातातील कागद नाना व मकरंदच्या समोर टाकून, शेतकऱ्यांना मदत व आम्हा मोलमजुरी करणाऱ्यांना काहीच कसं नाही, म्हणत टाहो फोडला. मागील तीन वर्षांपासून माझी पत्नी आजारी आहे.वडील मंदिरासमोर भीक मागतात, मला उपचारासाठी मदत करा, असे तो आक्रंदन करीत होता. त्याचे वृद्ध वडीलही त्याच्यापाठोपाठ याचना करीत मंचावर दाखल झाले. तेव्हा नाना व मकरंदने त्यांना शांत केले.