सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट व्हायरल; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:26 PM2019-05-27T13:26:40+5:302019-05-27T13:32:16+5:30
अशा पोस्ट लाईक, शेअर करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल
औरंगाबाद : फेसबुक आणि व्हॉटस्अॅप या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून दोन भिन्न जाती-धर्मांच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्यांविरोधात शहरातील तीन पोलीस ठाण्यांत वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी नोंदविले. शहराची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये अथवा अशा पोस्ट लाईक, शेअर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि नंतरही काही लोक सोशल मीडियावर दोन समाजांत तेढ आणि द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य करून अश्लील भाषेत बोलून दोन भिन्न समाजांतील काहींनी फेसबुकवर पोस्ट टाकल्या. या पोस्टवर उभय समाजातील लोकांनी परस्परविरोधात प्रतिक्रिया नोंदविल्या. या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. तसेच दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लीप तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी उस्मानपुरा, जिन्सी आणि सिटीचौक पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविले.
पोलिसांची करडी नजर
शहराची सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या उद्देशाने दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे व्हिडिओ अथवा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. जो कोणी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करील, लाईक करणे, शेअर करील आणि कमेंट करील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. - चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त