बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या सत्यप्रती घेण्यासाठीची गर्दी हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:43 PM2019-06-06T23:43:55+5:302019-06-06T23:44:28+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी बारावीचा निकाल तब्बल सहा वर्षांतील सर्वांत कमी लागला. याच वेळी विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे मंडळात पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची सत्यप्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी निकालानंतर नवव्या दिवशीही दिसून आली.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील बारावीच्या निकालाची टक्केवारी ८७.२९ एवढी होती. २०१४ पासून सर्वांत नीचांकी निकालाची नोंद यावर्षी झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची झेरॉक्स घेऊन पाहणी करण्याकडे कल अधिक वाढला आहे. ४ जूनपर्यंत २ हजार ३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका झेरॉक्ससाठी अर्ज दाखल केले आहेत. यात एका विद्यार्थ्याने तीन विषयाच्या उत्तरपत्रिकांची मागणी केली आहे. यासाठी प्रतिउत्तरपत्रिका ४०० रुपये याप्रमाणे १२०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या उत्तरपत्रिका देण्यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात येत आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दहा दिवसांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय थेट उत्तरपत्रिका न पाहता पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून प्रतिविषयासाठी ३०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहेत. यासाठी मंडळामध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे चित्र गुरुवारी (दि.६) पाहायला मिळाले.
पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार
बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी परीक्षा मंडळ जुलैमध्येच पुरवणी परीक्षा घेणार आहे. पुरवणी परीक्षा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात घेण्यात येत होती. ती यावर्षी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येणार आहे.