हतनूरला ऐतिहासिक, पौराणिक वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:05 AM2021-06-05T04:05:41+5:302021-06-05T04:05:41+5:30
कन्नड तालुक्यातील अशी अनेक गावे आहेत ती गावे ऐतिहासिक वारशातून उभी राहिली. त्यातील एक ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिकतेसह विकासाच्या ...
कन्नड तालुक्यातील अशी अनेक गावे आहेत ती गावे ऐतिहासिक वारशातून उभी राहिली. त्यातील एक ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिकतेसह विकासाच्या ऊर्जेने स्वयंप्रकाशित झालेले गाव म्हणून हतनूरची ओळख आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवना नदीच्या काठावरील या गावाचे क्षेत्रफळ ३ हजार ३२२ हेक्टर असून, लोकसंख्या साधारण ७ हजार आहे. गावात एकूण २८ जातीधर्माचे लोक आनंदाने राहतात. या गावाचा मुख्य व्यवसाय तसा शेती. अद्रक, कापूस, मका, मिरची, भाजीपाला ही हतनूरची मुख्य पीक पद्धती आहे. गावापासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर कन्नड तालुक्यातील सर्वांत मोठा शिवना-टाकळी प्रकल्प असल्याने गावातील बरेचसे क्षेत्र बारामाही ओलिताखाली असते. गावात पहिली ते दहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून, ७ अंगणवाड्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना ही शासकीय रुग्णालयांसह गावात २८ धार्मिक स्थळे आहेत. यातीलच एक धार्मिक स्थळ गावात महानुभव पंथीयांचे मुख्य शक्तीपीठ आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी केला. या ठिकाणी चक्रधर स्वामी यांनी एक रात्र मुक्काम केल्याची अख्यायिका आहे. असे मनाला प्रसन्न करणाऱ्या गावाची प्रकाशवाट कौतुकास्पद आहे.
-- गावाला ऐतिहासिक वारसा --
गावाच्या पूर्वेला म्हाळसानंद नावाने पुरातन टेकडी होती. काळाच्या ओघात ती नामशेष झाली. गावातील वयस्कर जाणकार लोकांकडून या टेकडीविषयी वेगवेगळ्या अख्यायिका सांगण्यात येतात. हतनूर हे गाव साधारण साडेचार हजार वर्षांपूर्वीचे गाव असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. ताम्रपाषाणकालीन असलेल्या या टेकडीवर गवळी लोक राहत असत. कालांतराने गाव हळूहळू मोठे होते गेले. ‘घण भर असणारे गाव मणभर’ झाले आहे.
-- गावाचे नाव हतनूर कसे पडले --
गावाच्या पूर्वेला शिवना नदी पावसाळ्यात दोन्ही दुथड्या भरून वाहते. त्या शिवना नदीमध्ये हत्तीडोह नावाचा एक डोह होता. याच डोहाच्या नावाने या गावाचे नाव हतनूर पडल्याचे जाणकार व इतिहासप्रेमी सांंगतात.
‘एक गाव, दोन मारोती’
आतापर्यंत आपण एका गावात मारोतीचे एकच मंदिर बघितले असेल; परंतु हतनूर गाव याला अपवाद आहे. या गावात आपल्याला चक्क दोन मारोतीची मंदिरे पाहायला मिळतात. या दोन मारोतींची कहाणी वेगळीच आहे. पाहुणा मारोतीची पुरातन कथा रंजक आहे. जुनी जाणकार मंडळी सांगतात की, काही वर्षांपूर्वी शिवना नदीला मोठा पूर आल्याने या पुरात कन्नड तालुक्यातील बहिरगाव येथून ही मारोतीची मूर्ती वाहून आली. त्यावेळी बहिरगावचे लोक मूर्तीला परत घेण्यास आले. मात्र, ती मूर्ती जागेची हलत नसल्याने गावातील लोकांनी मामा-भाच्याच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. सन १९४७ च्या अगोदर गावाच्या वेशीवर नागरिकांनी पाहुणा मारोतीचे मंदिर बांधले. नतंर नव्या पिढीने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने आज गावच्या वेशीवर मारोतीचे भव्य असे मंदिर आहे.
--- शासकीय नोकरीत नावलौकिक ---
शेती, धार्मिक, राजकीय, कला क्षेत्राबरोबर शासकीय नोकरीतसुद्धा गावातील तरुणांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. कन्नडच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून हारुण शेख कार्यरत आहेत. पूनम अग्रवाल या इन्कम टॅक्स ऑफिसर, तर चाणक्य जैन रेल्वे खात्यात सात जिल्ह्यांचे अधिकारी, तर मनोज गव्हाणे हे दोन वर्षांपूर्वी रेल्वे खात्यात भरती झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हटल्यावर नागरिकांत स्फूर्ती येते. ज्या राजांचा फोटो बघितल्यावर तरुणांमध्ये नवचैतन्य संचारते त्या शिवरायांचे आगमनच जर गावात झाले तर, अशी संकल्पना गावातील शिवजयंती समितीचे अध्यक्ष राजेंद्र अकोलकर यांच्यासह गावातील शिवभक्तांच्या मनात आली आणि लगेच अंंमल सुरू झाला. २९ सप्टेंबर २०२० रोजी हतनूर गावात मोठ्या थाटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. सकाळी महाराजांना मुजरा करण्यासाठी गावातील लहान, थोर, महिला, पुरुषांनी गर्दी केली होती. आगमन झाले, त्या दिवशी गावकऱ्यांनी महाराजांची आरती केली. यावेळी अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.