हतबल शिवसेनेने ‘समांतर’चे नाव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:00 AM2018-12-05T00:00:51+5:302018-12-05T00:01:28+5:30

शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले.

Hattalab Shivsena changed the name of 'Parallel' | हतबल शिवसेनेने ‘समांतर’चे नाव बदलले

हतबल शिवसेनेने ‘समांतर’चे नाव बदलले

googlenewsNext
ठळक मुद्देयोजना अधांतरी : १० वर्षांत एक लिटर पाणी आणले नाही


औरंगाबाद : शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे गोंडस नाव देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. योजनाच पूर्ण झालेली नसताना नाव कशासाठी बदलण्यात आले, असा आक्षेप एमआयएमने नोंदविला.
देशभरात मोठ्या शहरांची नावे बदलण्याचा ट्रेंड सुरू आहे. या राजकारणात भाजपने बरीच आघाडी घेतली आहे. महापालिकेतील शिवसेनेनेही यात उडी घेतली. शहराचे नाव बदलण्यात सेनेला यापूर्वीच अपयश आलेले आहे. आता सेनेने शहराची तहान भागविण्यासाठी उभारण्यात येणाºया जलवाहिनी प्रकल्पाचे नाव बदलले आहे. महापालिका वर्धापन दिनानिमत्त आयोजित पत्रकार परिषदेत महापौरांनी नमूद केले की, समांतर म्हटले तर नागरिकांच्या डोळ्यासमोर एक कंपनी येते. म्हणून आम्ही ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नवीन नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. समांतर म्हणजे पर्यायी असा अर्थ होतो. या प्रकल्पाला समांतर असे नाव कधीच दिलेले नव्हते. ते आपोआप पडले होते. आता आपण त्यास नाव दिले आहे.
दहा वर्षांपासून निधी पडून
जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत २००० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणण्यास केंद्र आणि राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला १६१ कोटी २० लाख रुपये दिले. या निधीवर मनपाने आजपर्यंत १२७ कोटी ९ लाख रुपये व्याज जमा केले आहे. मागील दहा वर्षांपासून शिवसेना-भाजप युती महापालिका निवडणुकांमध्ये समांतरच्या मुद्यावर निव्वळ आश्वासने देत आली आहे. भोळी जनताही युतीच्या शब्दावर विश्वास ठेवत आली आहे. मागील दहा वर्षांमध्ये युतीने एक थेंबही शहरात पाणी आणले नाही.
पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण
समांतर जलवाहिनी नावावर युतीने शहराच्या पाणीपुरवठ्याचे चक्क खाजगीकरण करून टाकले होते. खाजगी कंपनी नागरिकांच्या खिशावर अक्षरश: दरोडे टाकत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी २०१६ मध्ये कंपनीची हकालपट्टी केली. आता परत याच कंपनीला काम देण्यासाठी युतीचे नेते रेड कार्पेट अंथरूण बसले आहेत. कंपनीने मनपावर एवढ्या अटी-शर्ती टाकल्या आहेत की, मनपा त्या अटी कधीच मान्य करू शकत नाही.
पाणी कधी येणार?
समांतर जलवाहिनीच्या माध्यमाने शहरात पाणी कधी येईल, हे युतीचे नेते ठामपणे सांगू शकत नाहीत. योजनाच सध्या अधांतरी असताना योजनेचे नाव बदलण्याचे धाडस मंगळवारी करण्यात आले. महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने याला कडाडून विरोध दर्शविला. योजना तर पूर्ण होऊ द्या, असा सल्लाही विरोधी पक्षाने दिला. बाळ जन्माला येण्यापूर्वीच घाई कशासाठी, असा टोलाही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

Web Title: Hattalab Shivsena changed the name of 'Parallel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.