हौसेला मोल नसते ! औरंगाबादकराने 111 फॅन्सी नंबरसाठी मोजले 2.10 लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:38 PM2020-12-15T19:38:46+5:302020-12-15T19:40:38+5:30
आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते.
औरंगाबाद : वाहनांच्या नंबर प्लेटवर अनेकदा भाऊ, दादा, नाना, काका अशी नावे दिसतात. ही सर्व किमया फॅन्सी नंबरची असते. अशी नंबर प्लेट लावणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अशा नंबर प्लेटचे प्रमाण कमी झाले असले तरी फॅन्सी नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा आजही कायम आहे. यासाठी कोणी श्रद्धेपाटी, तर कोणी हौसेपोटी १५ हजारांपासून २ लाखांपर्यंतची रक्कम मोजत आहेत. यावर्षी १११ या क्रमांकासाठी सर्वाधिक २ लाख १० हजार रुपये मोजण्यात आले.
हौसेला मोल नसते, असे म्हटले जाते. वाहनांसाठी घेण्यात येणाऱ्या चॉइस, फॅन्सी नंबरच्या बाबतीत हीच स्थिती आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. त्यात आता वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे पसंती नंबरसाठी चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.
या तीन नंबर्सना सर्वाधिक दर
१११- दोन लाख १० हजार रुपये
७००७- एक लाख ५० हजार रुपये
१००१- एक लाख ५० हजार रुपये
आरटीओची कमाई
२०१९- २ कोटी ९२ लाख ८९ हजार रुपये
२०२०-२ कोटी ७७ लाख ७७ हजार रुपये
शहरवासीयांची विविध नंबरला पसंती
वाहनधारकांचा ९, ९९, ९९९,९९९९, २०२०, १०८, ७८६, ०२१४, ५१५१ अशा विविध नंबरकडेही ओढा दिसतो. अनेक जण जन्म तारीख, आपल्या पूर्वीच्या वाहनाचा क्रमांक घेण्यासही प्राधान्य देतात. सर्वसामान्य वाहनधारकांकडून १५ ते ५० हजारांदरम्यान शुल्क असलेला नंबर घेण्यास प्राधान्य दिले जाते.
पसंतीच्या नंबरसाठी अर्ज मागविण्यात येतात. काही ठरावीक नंबरकडे वाहनचालकांचा ओढा अधिक पाहायला मिळतो. पसंती नंबरसाठी आरटीओ कार्यालयात आकारण्यात येणारे शुल्क वाढीचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात सध्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.
- स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी