'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी
By योगेश पायघन | Published: February 22, 2023 06:25 PM2023-02-22T18:25:10+5:302023-02-22T18:26:43+5:30
'विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते.'
औरंगाबाद : हवा भी सही भी, दिया भी सही था, हवा का काम है चलना, दिये का काम है जलना.... अशा शब्दात आपल्या येथील मुल्यांकनाची पद्धत असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले. स्वातंत्र्यानंतर आलेले हे तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणाला स्वायत्तेकडे घेऊन जाईल. तर कुलगुरू परीषदेतील विचार मंथन त्यात दिशादर्शक ठरेल. असा विश्वास व्यक्त करतांना विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते. त्यामुळे इच्छा असूनही विद्यापीठाला न्याय देता येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
भारतीय विद्यापीठ महासंघाच्या पश्चिम विभागीय परिषदेचा समारोप बुधवारी (दि.२२) झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावतीने ही परिषद घेण्यात आली. महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. जी. डी. शर्मा अध्यक्षस्थानी होते. यावेळी महासचिव डॉ.पंकज मित्तल, यजमान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉ.के.व्ही.काळे, डॉ. विलास सपकाळ यांच्यासह विविध विद्यापीठांचे कुलगुरु, अधिष्ठाता डाॅ. वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ.जी.डी.शर्मा यांनी अध्यक्षीय समारोपात परीक्षा व मुल्याकंन पध्दतीबद्दल उहापोह करून विद्यापीठ महासंघ परीक्षा व मुल्यांकना संदर्भात महत्वाची भुमिका निभावेल असे स्पष्ठ केले. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी अहवाल वाचन केले. नोडल ऑफीसर डॉ. मुस्तजिब खान वत्यांच्या टिमने केलेल्या उत्कृष्ठ नियोजनाचे यावेळी कौतुक करण्यात आले. डॉ. सुचेता एम्बल यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी आभार मानले.
परीक्षा केंद्रीत अध्यापन ‘पॅटर्न’ बदलण्याची गरज
सध्याच्या शिक्षण पध्दतीत परीक्षा केंद्रीत’ अध्ययन, अध्यापन असल्यामुळे विद्यार्थ्यांना तणावाला सामोरे जावे लागते. वास्तविक अध्यापनवर आधारित कौशल्ये, परीक्षा हा पॅटर्न राबविल्यास विद्यार्थी हसत-खेळतील शिकतील, असा विश्वास विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांनी व्यक्त केला. शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनाही काही प्रमाणात स्वायत्ता मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
जाणीवा आणि उणीवांचे मुल्यांकन व्हावे
परिषदेत सकाळच्या सत्रात नाविण्यपूर्ण मुल्याकंन पध्दती व अध्यापकांचा क्षमता विकास याविषयी चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे सात्तत्यपूर्ण मुल्याकंन होणे गरजेचे आहे, असा सूर परिसंवादात निघाला. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.व्ही.काळे यांनी विद्यार्थ्यांच्या जाणीवा आणि उणीवांचे मुल्यांकन होणे गरजेचे असल्याचे सांगितले, प्रा.संदीप संचेती, डॉ.व्ही.एन.राजशेखर पिल्ले, डॉ.जी.जी.मिलाणी यांनी मार्गदर्शन केले.
समारोपाकडे कुलगुरूंची पाठ
कुलगुरू परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान मधील पहिल्या दिवशी ६० कुलगुरूंची उपस्थिती होती. तर ऑनलाईन ५० हून अधिक कुलगुरूंनी सहभाग नोंदवला. मात्र, समारोपावेळी निम्म्याहून अधिक कुलगुरू शिर्डी, वेरूळ येथे दर्शन पर्यटनाला निघून गेले होते. त्यामुळे मोजक्या कुलगुरूंच्या परिषदेत समारोप पार पडला. यावेळी कुलगुरूंपेक्षा विद्यापीठातील विभागप्रमुखांची संख्या अधिक होती.