श्रद्धा असूद्या, अंधश्रद्धा नको; ‘नागोबाला’दुध पाजू नका, हळदी-कुंकूवाने सापाचा होऊ शकतो मृत्यू
By साहेबराव हिवराळे | Published: August 2, 2022 11:50 AM2022-08-02T11:50:15+5:302022-08-02T11:51:00+5:30
कुणी नागोबाचा खेळ करण्याचा किंवा त्याच्यावर पैसे कमविण्याचा प्रयत्न केल्यास तो दंडास आणि गुन्ह्यास पात्र ठरणार आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : नागपंचमीदिवशी नागोबाच्या प्रतिकात्मक चित्राची पूजा केली जाते. तसेच वारूळावर जाऊन दूध, लाह्या हळदी-कुंकू वाहिल्या जातात; परंतु कुणीही नाग, सापाचा खेळ केला किंवा त्यावर पैसे कमाविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी वन विभागाची पथके तैनात आहेत.
शहरात वारूळ दिसत नाहीत. त्यामुळे नागोबाची प्रतिकृती असलेल्या फोटोची पूजा केली जाते. नागोबा घेऊन खेळ मांडणाऱ्यांवर वन विभागाचे पथक लक्ष ठेवणार आहे. कुणी नागोबाचा खेळ करण्याचा किंवा त्याच्यावर पैसे कमविण्याचा प्रयत्न केल्यास तो दंडास आणि गुन्ह्यास पात्र ठरणार आहे. वन विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पथके नियुक्त केली आहेत, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांनी सांगितले.
घ्या खबरदारी उपचार
अंधश्रद्धेतून पूजा करू नका, सापाला हाताळू नका, अघोरी बाबा, बुवांकडून उपचार न करता साप व नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार घ्यावा. प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे, असे वन्यजीवप्रेमी मनोज गायकवाड यांनी सांगितले.
तो शेतकऱ्यांचा खरा मित्रच...
साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो. तो पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. नागपंचमीला शेतात नांगरदेखील चालवित नाहीत. साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही. साप बदला घेत नाही.
साप दूध पितो का?
साप हा सस्तन प्राणी नाही. दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचे नाही.
सापाच्या अंगावर केस असतात का?
साप हा सस्तन प्राणी नाही, सस्तन प्राण्यांच्याच अंगावर केस असतात.
हळदी-कुंक त्याच्या शरीरासाठी अपायकारक असून, त्वचा खराब होऊन त्याचा मृत्यू होतो.
- डॉ. नरेंद्र सुतार, सेवानिवृत्त हाप्कीन्स)
सापाबद्दल या सर्व अंधश्रद्धा अशा...
- सापाच्या डोक्यावर मणी असतो
- सापाला केस असतात
- साप धनाचे रक्षण करतो
- साप पाठलाग करतो
- साप पुंगीवर नाचतो
- साप बदला घेतो
- साप दूध पितो
- विशिष्ट प्रकारच्या सापांमुळे धनलाभ होतो.