तुम्ही पोस्टातील योजनेत गुंतवणूक केली काय? विमा गुंतवणुकीस नागरिकांची गर्दी वाढली
By साहेबराव हिवराळे | Published: February 8, 2024 07:10 PM2024-02-08T19:10:37+5:302024-02-08T19:12:27+5:30
बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात.
छत्रपती संभाजीनगर : गुंतवणुकीच्या दृष्टीतून पाहिले तर अनेक योजना असून यामध्ये बरेच जण गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. गुंतवणूक करताना कोणताही गुंतवणूकदार हा सर्वप्रथम गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या गोष्टींना प्राधान्य देतो. पोस्टाच्या ३९९ रुपयांच्या अपघात पाॅलिसीमध्ये १० लाखांची सुरक्षा तुम्हाला मिळते. उपचारासाठी ६० हजार, प्रवासभाडे ३० हजार योजनेतून मिळते.
बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात. या खालोखाल पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांकडून पसंती दिली जात आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना
पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना ही एक प्रकारची डिपॉझिट योजना असून यामध्ये जर तुम्ही पाच वर्षांकरिता पैसे जमा केले तर या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्याज मिळू शकते. सध्या या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ७.७ टक्के दराने व्याज दिले जात आहे.
अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक होते..
या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. यामध्ये कोणत्याही नागरिकाला खाते उघडता येते व या योजनेत संयुक्त खात्याचीदेखील सुविधा देण्यात आलेली आहे. पालक अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकतात व दहा वर्षांपर्यंतची मुले स्वतःच्या नावावर या योजनेत खाते सुरू करू शकतात.
या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
जास्त कालावधीकरिता पैसे जमा करणे गरजेचे नसते. कारण या योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षांचा आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याजाचा लाभ देण्यात येतो आणि त्यासोबतच हमी परतावादेखील उपलब्ध आहे. कालावधीमध्ये व्याजदर कमी झाला किंवा वाढला तरी तुमच्या खात्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.
भक्कम मिळतो परतावा?
या योजनेमध्ये दहा लाख रुपये गुंतवले तर व्याजापोटी ४ लाख ४९ हजार ३४ रुपये मिळतात व पाच वर्षांनंतर तुम्ही एकूण तुम्ही गुंतवलेले १० लाख आणि व्याजापोटी मिळणारे ४ लाख ४९ हजार ३४ रुपये मिळून तुम्हाला १४ लाख ४९ हजार३४ रुपये मिळतात. १० लाख गुंतवणुकीतून तुम्ही पाच वर्षांत साधारणपणे साडेचार लाख रुपये या योजनेतून मिळवू शकता.
- संजय पाटील, पोस्ट मास्टर