छत्रपती संभाजीनगरात निसर्गरम्य, शांत वातावरणातील लक्ष्मीनृसिंह मंदिर पाहिलेय का?

By प्रशांत तेलवाडकर | Published: May 21, 2024 12:45 PM2024-05-21T12:45:47+5:302024-05-21T12:46:27+5:30

पैठणरोडवरील भव्य मंदिरात आज जयंती उत्सव

Have you seen Laxminrisimha Temple in the scenic, peaceful environment of Chhatrapati Sambhajinagar? | छत्रपती संभाजीनगरात निसर्गरम्य, शांत वातावरणातील लक्ष्मीनृसिंह मंदिर पाहिलेय का?

छत्रपती संभाजीनगरात निसर्गरम्य, शांत वातावरणातील लक्ष्मीनृसिंह मंदिर पाहिलेय का?

छत्रपती संभाजीनगर : भगवान विष्णूचे चौथे अवतार भगवान नृसिंह जन्मोत्सव आज, मंगळवारी (दि. २१) साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पैठणरोडवरील निसर्गरम्य, शांत वातावरणातील लक्ष्मीनृसिंह मंदिरात जन्मोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

गोलवाडी चौकातील अमृत साई गोल्ड सिटी कॉलनीतील उच्चभ्रू वसाहतीत एक सुंदर उद्यान आहे. त्याच उद्यानाच्या पूर्व-उत्तर (ईशान्य) कोपऱ्यात भव्यदिव्य मंदिर आहे. शांत व निवांत वातावरणातील हे मंदिर बघण्यासारखे आहे. ३५०० चौ.फुटांवर ३२ खांबांत हे मंदिर उभारण्यात आले आहे. भगवान विष्णूचा नृसिंह रूपातील रौद्र अवतार असल्याने मूर्तीही तशीच बनविली आहे. पाठीमागील बाजूस शेषनाग असलेली नृसिंहाची मूर्ती काळ्या पाषाणातील साडेपाच फुटांची आहे. मूर्तीचे वजन सुमारे साडेतीन टन आहे. शांत वातावरणातील या मंदिरात भगवंतांचे दर्शन घेताना मन प्रसन्न होते.

लक्ष्मीनृसिंह उपासना मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण खानवेलकर यांनी सांगितले की, २०१४ मध्ये मंदिर उभारण्यात आले. मंदिर उभारण्यासाठी मधुकर अनासपुरे, हरी करमाळकर, भास्करराव सातारकर यांनी प्रचंड मेहनत घेतली. मंगळवारी सकाळी भगवंतांचा अभिषेक, सकाळी १० वाजता केदार देशमुख यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम व दुपारी १२ वाजता जन्मोत्सवाची आरती व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

केळीबाजारात लक्ष्मी-नृसिंह मंदिर
शहरातील सर्वांत जुने १५० वर्षांपूर्वीचे लक्ष्मी-नृसिंह मंदिर आहे. केळी बाजारात एका चिंचोळ्या गल्लीत हे छोटे मंदिर आहे. काही वर्षांपूर्वीच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. काळ्या पाषाणातील लक्ष्मी-नृसिंहाची मूर्ती दीडशे वर्षे जुनी आहे. येथे भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

देशात दोन दिवस साजरा होणार नृसिंह जन्मोत्सव
वैशाख शुक्ल चतुर्दशी सूर्यास्त समयी असलेल्या दिवशी नृसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र, त्रयोदशीच्या दिवशी व चतुर्दशीच्या दिवशी असे दोन्हीही दिवशी सूर्यास्ताच्या वेळी चतुर्दशी तिथी मिळत आहे. अशा वेळी चतुर्दशीच्या दिवशी जन्मोत्सव साजरा करावा. पंचांगानुसार महाराष्ट्रासाठी मंगळवारी २१ मे रोजी श्रीनृसिंह जन्मोत्सव दिलेला आहे. मात्र, ज्या प्रदेशात बुधवारी २२ मे रोजी सूर्यास्त सायंकाळी ६:४७ पूर्वी होत आहे. अन्य राज्यात तिथे बुधवारी जन्मोत्सव साजरा करावा असे म्हटले आहे.

Web Title: Have you seen Laxminrisimha Temple in the scenic, peaceful environment of Chhatrapati Sambhajinagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.