दर १७ दिवसाला काढावी लागतेय एकीची गर्भपिशवी; गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते
By संतोष हिरेमठ | Published: June 5, 2023 11:43 AM2023-06-05T11:43:28+5:302023-06-05T11:44:59+5:30
लठ्ठपणा, लवकर मासिक पाळी येणे ठरतेय धोकादायक
छत्रपती संभाजीनगर : एका नव्या जिवाला जन्म देणाऱ्या महिलांच्या गर्भाशयाचे आरोग्य कॅन्सरमुळे दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात गेल्या ७ वर्षांत गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे १४३ महिलांच्या गर्भपिशवी काढाव्या लागल्या. म्हणजे जवळपास १७ दिवसाला एकीची गर्भपिशवी काढावी लागत असून, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
इंटरनॅशनल गायनॅकालाॅजिक कॅन्सर सोसायटीने जागतिक पातळीवर जून महिना हा ‘गर्भाशय कॅन्सर जागरूकता महिना’ म्हणून घोषित केला आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी जनजागृती वाढावी, या कर्कराेगाच्या रुग्णांना उपचाराची सेवा मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे. जागतिक स्तरावर स्त्रियांमध्ये आढळणारा हा कर्करोग सहाव्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट, मुख आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण हे प्रामुख्याने जास्त आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीकर्करोग विभागप्रमुख डाॅ. अर्चना राठोड, डाॅ. भक्ती कल्याणकर आदी गर्भाशयाच्या कर्करोगानेग्रस्त महिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करतात.
या महिलांना सर्वाधिक धोका
- स्थूलता असणे
- आनुवंशिकता.
- वयाच्या १२ व्या वर्षाआधीच मासिक पाळीला सुरुवात झाली असेल तर.
- उशिरा रजोनिवृत्ती.
- ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे.
लक्षणे..
- रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून रक्तस्राव होणे.
- दोन मासिक पाळीत अनियमित रक्तस्राव होणे.
- मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे.
- ओटीपोटीत दुखणे.
असा करा प्रतिबंध
- वजन नियंत्रित ठेवणे
- नियमित व्यायाम
- आहारात ॲनिमल फॅटचे प्रमाण कमी ठेवणे.
- कौटुंबात कुणाला कर्करोगाचा इतिहास असेल तर वयाच्या ३५ वर्षांनंतर दरवर्षी चाळणी परीक्षण करून घेणे.
- लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील स्थिती
वर्ष- नवीन रुग्ण- जुने रुग्ण- गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया
२०१६- २३-५८-१३
२०१७-२६-६०-२४
२०१८-२३-६९-३५
२०१९-६३-११२-१२
२०२०-२४-१०५-४
२०२१-४५-१६०-१४
२०२२-४७-१३१-४१
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
गर्भाशयाच्या कर्करोगाच्या महिलांमध्ये लक्षणे आढळतात. त्यामुळे वेळीच आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये निदान करून घेणे शक्य होते. त्यामुळे महिलांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. शासकीय कर्करोग रुग्णालयात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, किरणोपचार, हार्मोन थेरपी उपलब्ध आहे.
- डाॅ. अर्चना राठोड, स्त्री कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.