चारा छावण्यांबाबत अहवाल मागविला
By Admin | Published: February 23, 2016 11:47 PM2016-02-23T23:47:19+5:302016-02-24T00:03:18+5:30
हिंगोली : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक चारा छावण्या बंद झाल्याने हाहाकार उडाला होता.
हिंगोली : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक चारा छावण्या बंद झाल्याने हाहाकार उडाला होता. त्यामुळे शासनाने आता प्रत्येक जिल्ह्यातून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. यासाठी २९ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त बैठक घेणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यात तूर्त चाराटंचाईचा प्रश्न नाही. मात्र यंदा भविष्यात हा प्रश्न समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्वारीचे आगार असणारे तालुकेच यंदा दुष्काळाच्या छायेत होते. शिवाय रबीतील ज्वारीही घेता आली नसल्याचा फटका सोसावा लागणार आहे. शेजारचे जिल्हेही दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. अशा परिस्थितीत औंढा, वसमत, कळमनुरी या तालुक्यांत नजीकच्याच काळात चाराटंचाईचा फटका बसण्याची भीती आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे आता जुना चाराही गृहीत धरून चालणार नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व कृषी विभागाचा अहवाल हा पेरणी क्षेत्रावरून अंदाज बांधणारा असतो. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच असते. त्यामुळे पुन्हा एकदा वस्तूनिष्ठ अहवालाच्या नावाखाली क्षेत्र व चारा उत्पादनाचे सूत्र कागदावर मांडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. छावण्यांची झंझट टाळण्याचाच प्रयत्न होणार आहे.